नाशिकशहराच्या सिडको परिसरातील दुर्गा देवीच्या मंदिराजवळ असलेल्या जांभूळाच्या झाडावर जांभूळ तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (29 जून) घडली आहे.याची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिडको भागातील त्रिमूर्ती चौक परिसरातील दुर्गा देवीच्या मंदिराच्या मागे वीज बिल भरणा केंद्र आहे.
या केंद्राच्या पाठीमागे जांभळाचे झाड आहे.या झाडावर बुधवारी (29 जून) दुपारी 1 वाजेच्या सुमारास गणपत महादू वळवी हे जांभूळ तोडण्यासाठी चढले होते. जांभूळ तोडत असताना अचानक त्यांचा पाय घसरला. तोल न सांभाळत आल्याने गणपत हे खाली येऊन जमिनीवर कोसळले. खाली जमिनीवर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना परिसरातील नागरिक आणि घरच्यांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गणपत यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.