दहावी म्हणजे SSC परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. सकाळी मंडळानं पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.
विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजेनंतर हा निकाल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सांगितलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.
राज्यातील दहावीच्या निकालाची यंदाची टक्केवारी 95.81 टक्के एवढी आहे. नऊ विभागांमधून यंदा 15 लाख 49 हजार 326 एवढ्या नियमित विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 84 हजार 449 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणं विभागांचा विचार करता यावेळीही कोकण विभागानं 99.01 टक्के निकालासह बाजी मारली आहे.
मुलांच्या आणि मुलींच्या निकालाची तुलना करता मुलींनी 97.21 टक्के निकालासह बाजी मारली. तर मुलांची टक्केवारी 94.56 एवढी आहे.
विभागनिहाय निकालाचा विचार करता कोकण 99.01 टक्के, कोल्हापूर 97.45 टक्के, पुणे 96.44 टक्के, मुंबई 95.83 टक्के, अमरावती 95.58 टक्के, नाशिक 95.28 टक्के, लातूर 95.27 टक्के, छत्रपती संभाजीनगर 95.19 टक्के आणि नागपूर 94.73 टक्के अशी आकडेवारी आहे.
या वेबसाईटवर पाहू शकता निकाल
बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबतच विषयानुसार गुणांचा तपशीलही या संकेतस्थळांवर पाहता येईल. तसंच, निकालाची प्रिंटही घेता येईल.
1) mahresult.nic.in
2) https://sscresult.mkcl.org
3) https://sscresult.mahahsscboard.in
4) https://results.digilocker.gov.in
187 मुलांना 100 टक्के
राज्यातील 9382 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर राज्यातील 38 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे.
तर 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 187 एवढी आहे. कला क्रीडा एनसीसी स्काऊट गाईड अशा अतिरिक्त गुणांमुळं विद्यार्थ्यांचे 100 टक्के गुण होतात.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आयोजित केलेल्या परीक्षेतील एकूण 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
या परीक्षेत एटीकेटी पद्धत असल्यामुळं एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही अकरावीत प्रवेश मिळणार आहे. अकरावीचा निकाल लागेपर्यंत त्यांना या विषयांत उत्तीर्ण व्हावं लागेल.
यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल मे मध्ये ऑनलाईन जाहीर करण्यात बोर्डाला यश आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
यापूर्वीच निकाल लागलेल्या बारावीचे गुणपत्रक 3 जूनला महाविद्यालयात वितरीत केलं जाणार आहे. तर 10 वीच्या गुणपत्रकाबाबत निवेदन देऊन माहिती देणार असल्याचं ते म्हणाले.
असा पाहता येईल निकाल
निकाल मिळवण्यासाठी सर्वात आधी वर देण्यात आलेल्या बेवसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर वेबसाईटवरील 10 वी च्या निकालाची लिंक ओपन होईल.
निकालाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल.
परीक्षा, सीट क्रमांक, आईचे नाव अशा प्रकारची माहिती टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करावे लागले.
त्यानंतर तुम्हाला संबंधित परीक्षार्थ्याचा निकाल स्क्रीनवर दिले.
त्याबाबतचे पीडीएफ डाऊनलोड करता येईल किंवा त्याचे प्रिंटही काढता येईल.
Published By- Priya Dixit