उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची तुलना थेट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. त्यावरून भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार पडळकर यांनी आपल्या ट्विटरवर जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रुपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय असे म्हंटले आहे.
सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी लखीमपूर खेरी प्रकरणात प्रियंका गांधी यांनी लढा उभारला त्यावेळी त्यांच्यामध्ये देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची झलक दिसली असे म्हंटले आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात मंत्रीपुत्राने चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. सीबीआय, ईडीसारख्या तपस यंत्रणा कोणालाही अटक करत आहे. पण चार खून पचवून जगातला सर्वांत मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला असताना त्याची झोप प्रियांका गांधी यांनी उडवली आहे. यानिमित्ताने भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक प्रियंका गांधींमध्ये दिसते, असे राऊत यांनी म्हंटले आहे.