महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक धक्कादायक अन् तितकीच चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणाला त्याच्या वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी अपहरण केल्याचा बहाणा करून अटक करण्यात आली आहे. वडिलांपासून पैसे घेण्यासाठी 20 वर्षीय मुलानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील फादरवाडी भागातील हे प्रकरण आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसईतील फादरवाडी भागातील 20 वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसात केली होती. त्यांचा मुलगा 7 डिसेंबरला घरातून निघून गेला जो पुन्हा परत आला नसल्याचे या तक्रारीत म्हणले होते. तसेच मुलाने त्यांना फोन करुन अपहरण झाल्याचेही सांगितले होते.
दरम्यान मुलाने वडिलांना फोन करुन "तीन जणांनी माझे अपहरण केले आहे. ते 30 हजार रुपयांची मागणी करत आहेत. खंडणी दिली नाही तर मला मारुन टाकतील..." असे म्हणत एक QR कोडही पाठवल्याचे त्यांनी या पोलिस तक्रारीत म्हणले होते.
या तक्रारीनंतर मुलाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आणि वसई, विरार, नालासोपारा आणि इतर ठिकाणी मुलाचा शोध घेतला. अखेर पोलिसांनी शनिवारी (9, डिसेंबर) वसई फाटा येथून या मुलाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. ज्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला.
मुलाला त्याची गाडी दुरूस्त करण्यासाठी वडिलांकडून पैसे हवे होते. मात्र वडील पैसे द्यायला तयार नव्हते. त्यामुळेच हा सगळा अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, मुलाने पाठवलेला क्युआर कोड ओळखीचा वाटल्याने वडिलांना संशय आला. ज्यामुळे त्यांनी पैसे न पाठवता पोलिसांत तक्रार दाखल केली.
Edited by -Ratnadeep Ranshoor