Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठीला राज्य भाषेच्या दर्जासाठी 17 रोजी पणजीत आंदोलन

marathi bhajsha
पणजी , मंगळवार, 14 जून 2022 (09:15 IST)
मराठीला राज्य भाषेचा दर्जा द्यावा म्हणून विधानसभेत ठराव संमत झाला असतांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सुध्दा त्याची अंमलबजावणी होत नसल्याने गोवा क्रांती दिनाच्या पूर्व दिवशी 17 जूनला सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत पणजी येथे आझाद मैदानावर मराठी प्रेमी धरणे आंदोलन करणार आहेत. आज मराठी राज्य भाषा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गोमंतक साहित्य सेवक मंडळात शनिवारी समितीचे निमंत्रक गो. रा. ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला व्यासपीठावर माजी केंद्रीय कायदा मंत्री ऍड. रमाकांत खलप, गोमंतक मराठी अकडमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, दिवाकर शिंपे,प्रकाश भगत, व्यंकटेश विश्वनाथ नाईक उपस्थित होते.
 
गो. रा. ढवळीकर म्हणाले, घटनेच्या 345 कलमात,शासकीय व्यवहारातील एकाहून अधिक वापरात असलेल्या भाषा राजभाषा होऊ शकतात असे स्पष्टपणे म्हटले असतांना आणि गोव्यात मराठीचे नैसर्गिक अस्तित्व असतांना मराठीवर अन्याय केला जात आहे.मराठीचे महत्व लक्षात घेऊन आज कोकणी लेखक मराठी वर्तमानपत्रातून लिहायला लागलेत. बहुसंख्य वाचकांपर्यंत लिखाण मराठीमधून लिहिल्याने पोचेल हे त्यांना उमगले आहे.मराठीला राज्य भाषा दर्जा देण्याचा निर्णय, तांत्रिक अभ्यास करून घेतला जाईल असे सांगून मुख्यमंत्री या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत.
 
ऍड. खलप यांनी सांगितले की, मराठी ही शासकीय व्यवहारातील भाषा असताना त्याची अंमलबजावणी केली जात नाही. अल्पसंख्यांची मते मिळवण्यासाठी मराठीवर अन्याय केला जात आहे.मराठीप्रेमींच्या मतांवर निवडून येऊन सुद्धा मराठीच्या बाजूने ठामपणे राहील असा एकही आमदार आज विधानसभेत नाही.धरणे आंदोलनाच्या जागृतीसाठी तालुक्मयाच्या ठिकाणी बैठका घ्याव्यात अशी सूचना त्यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यसभा निवडणुकीत मत बाद; आमदार सुहास कांदे यांची उच्च न्यायालयात धाव