राज्यात भाजप नेते पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसंच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यात सातत्याने संघर्ष आणि वर्चस्वाची लढाई पाहायला मिळत आहे.
आता पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळीतील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
वैद्यनाथ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये खासगी क्लासेस घेत आहेत, असे आरोप दोन वर्षांपूर्वी झाला. इतकंच नाही तर या संदर्भात थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही करण्यात आली. त्याचबरोबर महाविद्यालयातील नोकर भरतीत सुद्धा अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र हा सगळा खटाटोप केवळ संस्था धनंजय मुंडे यांना ताब्यात घेण्यासाठी होत असल्याचा आरोप पंकजा मुंडे गटाकडून करण्यात येत आहे.
जवाहर एज्युकेशन संस्थेत सुरु असलेल्या वादामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी चौकशीसाठी 4 जानेवारीला त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून ही समिती आपला अहवाल पंधरा दिवसांत विद्यापीठाकडे सादर करणार आहे.