महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढतोय, त्यात दुसरीकडे कोरोना लशीचा तुटवडाही वेगानं वाढतोय आणि या मुद्द्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही वाढतायेत.
बीडमधील मुंडे भाऊ-बहिणींच्या ताज्या आरोप-प्रत्यारोपांनी आता चर्चेला तोंड फोडलं आहे. याची सुरुवात बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केली.
डॉ. प्रीतम मुंडे यांनी ट्वीटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री यांना उद्देशून म्हटलं की, "केंद्रातून राज्यासाठी आलेल्या 2 लाख लशींपैकी बीडच्या वाटणीला केवळ 20 लशी. हे निषेधार्ह आहे. हा असमतोल आपणच दूर करावा."
याच ट्वीटमधून डॉ. प्रीतम मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. त्या म्हणाल्या, "माफियाची पाठराखण करणाऱ्या बीडच्या मंत्र्यांकडून जिल्हा काही अपेक्षा ठेवू शकत नाही."
डॉ. प्रीतम मुंडे यांच्या या ट्वीटनंतर धनंजय मुंडे यांनी उत्तरादाखल एकामागोमाग एक काही ट्वीट्स केले आहेत.
आपल्या पहिल्याच ट्वीटमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटलंय की, "अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लशी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लशी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल."
विशेष म्हणजे, धनंजय मुंडे यांनी डॉ. प्रतीम मुंडे यांच्या ट्विटर हँडलला हे ट्वीट टॅगही केलंय. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी थेट डॉ. प्रतीम मुंडेंना उद्देशून ही उत्तरं दिलेत, हे स्पष्ट आहे.
धनंजय मुंडे यांनी एकूण 6 ट्वीट्सचं उत्तर डॉ. प्रीतम मुंडे यांना दिलंय.
त्यातील एका ट्वीटमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटलं, "ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल!"
शिवाय, शेवटच्या ट्वीटमध्ये लशींच्या आकडेवारीच्या तक्त्याचा फोटो ट्वीट करत, धनंजय मुंडे यांनी म्हटलंय की, "कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त 2 लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या 20 लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे,आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये?"
'ट्वीटवॉर' केवळ बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यापुरताच मर्यादित राहिला नाहीय. कारण या वादात भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही उडी घेतलीय.
पंकजा मुंडे या बहीण डॉ. प्रीतम मुंडे यांच्या मदतीला धावल्या. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट ट्वीट करत म्हटलंय की, "राज्याच्या भल्यासाठी PM,जिल्ह्याच्या CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा,विकास निधी,अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!"
एकूणच बीडमधील कोरोना लशीच्या पुरवठ्याबाबत मुंडे भाऊ-बहिणींमध्ये चांगलंच 'ट्वीटवॉर' रंगलंय.