कराची थकबाकी असलेल्या नागरिकांसाठी जळगांव महापालिका प्रशासनाकडून अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आठ दिवसात तब्बल १ कोटी ६९ लाख रुपयांचा भरणा नागरिकांकडून करण्यात आला आहे.
मालमत्ता कराचा भरणा वाढवून मनपाच्या कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अभय राबविण्यात आली होती होती. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापर्यंत सूट देण्यात येत होती. या योजनेला उत्तम प्रतिसाद लाभल्याने ही योजना पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी मनपा आयुक्तांकडे केली होती. दरम्यान, प्रशासनाकडून दि.१५ नोव्हेंबर २०२१ पासून ते १५ जानेवारी २०२२ पर्यंत ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १५ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान भरणा केल्यास शास्तीमध्ये ९० टक्के सूट, दि.१५ ते ३१ डिसेंबरपर्यंत भरणा केल्यास शास्तीत ७५ टक्के तर दि.१ ते १५ जानेवारी २०२२ पर्यंत भरणा केल्यास शास्तीत ५० टक्के सूट देण्यात येणार आहे.
अशी आहे प्रभागनिहाय वसुली
अभय योजनेअंतर्गत आठ दिवसात १ कोटी ६९ लाख ७४ हजार ९८१ रुपयांची वसूली झाली आहे. यात प्रभाग क्रमांक १ मध्ये ४७ लाख ५ हजार ३०६ रुपये, प्रभाग क्र. २ मध्ये ३६ लाख १४ हजार ६७० रुपये, प्रभाग क्र. ३ मध्ये ५२ लाख ५० हजार ९४६ तर प्रभाग क्र.४ मध्ये ३४ लाख ४ हजार ५९ रुपयांची वसूली करण्यात आली आहे.