Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी, ही आहे नियमावली

शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी, ही आहे नियमावली
, सोमवार, 5 जुलै 2021 (17:08 IST)
राज्य सरकारने कोव्हिड-मुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.
 
कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून राज्यातील शाळा बंद असून टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्याबाबत सरकारकडून अनेकदा नियमावली जाहीर करण्यात आली. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता काही अंशी सुरू झालेल्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
 
आता राज्यात लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथिल केल्यानंतर केवळ कोव्हिड-मुक्त भागातील शाळा सुरू करता येऊ शकतात असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना काही निकषांच्या आधारे शाळा सुरू करता येणार आहेत.
 
शाळा सुरू करण्याचे निकष
1. कोव्हिड-मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी पालकांशी चर्चा करुन ठराव करावा.
2. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे. प्राधान्याचे विषय ठरवून वेळापत्रक तयार करण्यात यावे.
3. एका बेंचवर केवळ एकच विद्यार्थी बसू शकतो. तसंच एका वर्गात एकावेळी केवळ 15-20 विद्यार्थी बसू शकतील.
4. दोन बेंचमध्ये किमान सहा फूटाचे अंतर हवे.
5. प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे.
6. शाळेतील शिक्षकांच्या राहण्याची सोय गावात करावी. किंवा शिक्षकांना सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करावा लागणार नाही याची खबरदारी घ्यावी.
7. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी.
 
पालकांनी कोणती काळजी घ्यावी?
राज्य सरकारने आपल्या शासन निर्णयामध्ये पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत काही सूचना केल्या आहेत.
 
1. आजारी असललेल्या आणि कोरोनाची लक्षणं असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत पाठवू नये.
2. कुटुंबातील व्यक्तींनी नियमितपणे वाफ घ्यावी तसंच इतर दक्षता घ्यावी.
3. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मानवाधिकार कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांचे निधन