काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी देशात प्लास्टिक चलनी नोटा व्यवहारात आणण्याचे जाहीर केले आहे. या नोटा आयात न करता, नाशिकरोड प्रेसला हे काम मिळावे, अशी मागणी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन् २०१४ साली प्लॅस्टिक नोटा बनविण्याचा व या नोटा बाहेरच्या देशातून मागविण्याचा प्रश्न चर्चेत आला होता. मजदूर संघाने प्लॅस्टिक नोट आयातीला तेव्हाच आक्षेप घेतला होता. मजदूर संघाच्या नेत्यांनी रिझर्व बँकेच्या गर्व्हनरला भेटून प्लॅस्टिक नोटांचे काम नाशिकरोड प्रेसला मिळावे, अशी मागणी केली होती. प्लॅस्टिक नोटा छापण्याचे तंत्रज्ञान नाशिकरोड प्रेसमध्ये आहे. प्रेस कामगारही कुशल आणि मेहनती आहेत. फक्त मशिनरी अपग्रेडेशन करण्याची गरज आहे. ते झाल्यास प्लॅस्टिक नोटा येथे छापता येतील,असा दावाही त्यांनी केला आहे.प्लॅस्टिक नोटा छापण्याचा निर्णय होईल तेव्हा आमचे कामगार या नोटा छापून देण्यास सक्षम राहतील, असा विश्वास प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी व्यक्त केला.