Play with the lives of patients शिक्षण आणि नागरिकांच्या आरोग्या संदर्भातील खळजबळजनक बातमी समोर आली आहे. बनावट मार्कशीट आणि सर्टिफिकेट बनविण्याचे लोण आता मुक्त विद्यापीठापर्यंत येऊन पोहोचले आहे. बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब सुरु करुन रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार मुक्त विद्यापीठाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.
या प्रकरणी चार एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर, 20 विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे. पॅथॉलॉजी लॅब सुरु करणासाठी बनावट कागदपत्रं तयार करून देणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश पॅरामेडिकल कॉन्सिल आणि मुक्त विद्यापीठाने केला आहे.
सन 2020-21 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षण घेत यवतमाळ, ठाणे, जळगाव, अहमदनगर, मनमाड अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या 20 विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे बीएससी एमएलटी आणि डीएमएलटी या पदव्यांचे मुक्त विद्यापिठाच्या नावाचे बनावट मार्कशीट, सर्टिफिकेट तयार केले होते. लॅब सुरु करण्याची मान्यता घेण्यासाठी पॅरामेडिकल काउन्सिलकडे अर्ज करण्यात आला होता.
राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड
संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी काउन्सिलने मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे विचारणा केली असता असे विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतं नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. यानंतर विद्यापीठाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी केली असता विद्यापीठचे बनावट सही, शिक्के याच्या माध्यमातून बनावट गुणपत्रक, प्रमाणपत्रक तयार केल्याचं निदर्शनास आला आहे.
बनावट कागदपत्र प्रकरणी 20 विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस
चौकशी समितीने 20 विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस पाठवून बनावट कागदपत्रे कोणाकडून घेतली याबाबतीत चौकशी सुरु केली असता साधारण 14 जणांच्या चौकशीत काही नाव समोर आली आहेत. त्यापैकी नागपूरचा गौरव शिरसकर, सातारचा रमेश होनामोरे,अहमदनगरचा अशोक सोनवणे आणि नांदगावचा संजय नायर यांची नाव समोर आली असून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या तपासासाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना होणार आहे.
चार जणांवर गुन्हे दाखल, अधिक तपास सुरु
ज्या 20 विद्यार्थ्यांच्या नावे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले आणि ज्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा आणि विद्यापीठाचा आजवर कधीच संबंध आला नसल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यानं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचे सही, शिक्के संशयित एजंटपर्यंत कसे पोहचले, असा सवाल उपस्थित होत आहे. विद्यापीठातील कोणी या कारस्थानात गुंतले आहे का, असा संशय देखील व्यक्त केला जात असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास केला जाणार आहे.
पॅरा वैद्यकीय परिषद आणि मुक्तविद्यापीठाच्या सतर्कतेमुळे एक गुन्हा उघडकीस आला आहे. आता प्रमाणपत्र तयार करताना विशेष खबारदारी घेतली जात असून क्यू आर कोड, बार कोडसह 15 वेगवेगळे सुरक्षाचे मापदंड नवीन प्रमाणपत्राना देण्यात आले आहेत. त्यामुळे खोटे दाखले प्रमाणपत्र तत्काळ उघडकीस येतील. मात्र इतरही विद्यापीठातून अशा स्वरुपाचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले असतील तर त्याचा तपास व्हावा या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यात आल्यानं तपासासत काय निष्पन्न होते, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे.