पोकेमन गो खेळण्याच्या नादात चर्चमध्ये घुसलेल्या एका युवकाला तीन महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
रुस्लान सोकोलोव्हस्की या 22 वर्षांच्या युवकाला रशियन न्यायालयाने ही तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. येकातरीनबर्गच्या युराल्स शहरातील ही घटना आहे. पोकोमन गो खेळताना चर्चमध्ये घुसलेल्या रुस्लान सोकोलोव्हस्कीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सन 2012 साली पास करण्यात आलेल्या एका कायद्यान्वये त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेलेआहेत.
रुस्लान सोकोलोव्हस्की हा एक निरीश्वरवादी-नास्तिक युवक आहे. त्याने आपल्या आयफोनवर पोकोमन गो खेळताना चर्चमध्ये घुसल्याचा व्हिडियो यूट्यूबवर अपलोड केला होता. हा व्हिडियो लाखो लोकांनी पाहिला.
येकातरीनबर्गच्या किर्व्होस्की न्यायालयाने शुक्रवारी रुस्लान सोकोलोव्हस्कीला ‘प्री ट्रायल’ तीन महिने तुरुंगवास सुनावला आहे. जर रुस्लान सोकोलोव्हस्कीवरील आरोप शबीत झाला, तर त्याला पाच वर्षंपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
न्यायालयाच्या निर्णयावर मानवी हक्क सल्लागार मंडळाच्या प्रेसिडेंन्शियल कौन्सिलचे प्रमुख मिखाईल फेदोटोव्ह यांनी टीका केली आहे. एको ऑफ मॉस्को रेडियोवर त्यांनी सांगितले, की रुस्लान सोकोलोव्हस्कीला शिक्षा होणे योग्य नाही. आम्नेस्टी इंटरनॅशनलने रुस्लान सोकोलोव्हस्कीला ताबडतोब मुक्त करण्याची मागणी केली आहे.