बनावट नोटा छापणारी आणि वापरात आणणाऱ्या टोळीचा इस्लामपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील मुख्य संशयिताच्या घरावर छापा टाकला असून पोलिसांनी 7 लाख 66 हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त केले आहे. आणि बनावट नोटा छपाईचा कारखाना उध्वस्त केला आहे.
इस्लामपूर येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील पैसे भरण्याच्या डिपॉझीट मशीनमध्ये या टोळीकडून तीन हजाराच्या बनावट नोटा भरण्यात येत होत्या. याप्रकरणी 4 संशयितांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली.
एचडीएफसी बँकेतील अधिकारी संग्राम सदाशिव सूर्यवंशी यांनी पाचशे रुपयांच्या सहा नोटा बनावट असल्याचे माहित असतानाही त्या डिपॉझिट मशीनमध्ये भरल्या होत्या. या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात 19 मे रोजी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संग्राम सूर्यवंशीकडे केलेल्या तपासात पिंटू निवृत्ती पाटील, सुरेश नानासाहेब पाटील, मुख्य सूत्रधार श्रीधर बापू घाडगे, रमेश ईश्वर चव्हाण यांची नावे निष्पन्न झाली.
मुख्य सूत्रधार श्रीधर घाडगे यांच्या सांगलीतील भाड्याने राहत असलेल्या घरावर पोलिसांनी पाळत ठेवली होती. तो त्याच्या मोटारीतून घाईगडबडीने जात असताना पोलिसांना दिसला. त्याच्या मोटारीची झडती घेतल्यावर पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास आणि वीस रुपयांच्या एकूण 6 लाख 94 हजार दोनशे पन्नास रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल मिळून आले. त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटांची छपाई करण्याचे साहित्य मिळून आले. या बनावट नोटा छपाई करण्यासाठी वापरलेल्या प्रिंटर आणि 72 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. घाडगेने पाण्याच्या टाकीत लपवून ठेवलेले इतर साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले.