Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धर्माच्या नावावर होणारे राजकारण थांबविले पाहिजे दंगली झाल्या की समजावे, निवडणुका आल्या… छगन भुजबळ

chagan bhujbal
, मंगळवार, 23 मे 2023 (09:03 IST)
आता येणार्‍या काळामध्ये धर्माच्या नावावर नाही, तर तुम्ही नागरिक , कामगार, शेतकरी व कष्टकरी वर्गाचे किती प्रश्‍न सोडविले, यावर निवडणुकीच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आता धर्माच्या नावावर होणारे राजकारण हे थांबविले पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. छगन भुजबळ यांनी व्यक्‍त केले आहे.
 
माजी उपमुख्यमंत्री आ. भुजबळ नाशिकमध्ये सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की ज्यावेळी दंगली घडविला जातात, त्यावेळी त्या भागामध्ये निवडणूक आली, असे स्पष्ट समजावे. कारण हिंदू धर्मीयांची सहानुभूती मिळविण्यासाठी अशा स्वरूपाच्या दंगली घडविण्याचे कटकारस्थान रचले जाते, असे गंभीर आरोप करून ते पुढे म्हणाले, की आता धर्माच्या नावावर ती राजकारण होऊ शकत नाही आणि त्या माध्यमातून विजय गाठणेदेखील राजकीय पक्षांना येणार्‍या काळात शक्य होणार नाही. कारण आता नागरिकांना त्यांचे प्रश्‍न महत्त्वाचे वाटू लागले आहेत.
 
शेतकरी, कष्टकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्‍न सुटले की नाहीत, आपल्याला न्याय मिळाला की नाही, याकडे अधिक गांभीर्याने बघू लागल्याने राजकारणाची दिशादेखील येणार्‍या काळात बदलावी लागणार आहे. तळागाळात जाऊन कामे करावी लागतील. नागरिकांचे व कष्टकर्‍यांचे प्रश्‍न सोडवावे लागतील, तरच येणार्‍या निवडणुकीमध्ये विजय होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
 
जयंत पाटील निर्दोष
पत्रकारांच्या अन्य प्रश्‍नांबाबत बोलताना आ. छगन भुजबळ म्हणाले, की आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पूर्णपणे निर्दोष आहेत. त्यांना विनाकारण अडकविण्याचे काम केले जात आहे, त्यांची कितीही वेळा चौकशी केली, तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असे स्पष्टपणे सांगून आ. भुजबळ म्हणाले, की आता केंद्र सरकार ईडी, सीबीआय हे जाणून बुजून काही विशिष्ट राजकीय नेते आणि त्यानंतर अधिकार्‍यांना त्रास देण्याचा प्रकार करीत आहे; परंतु आता हेच खूप दिवस चालणार नाही सुरुवातीला हा प्रयोग माझ्यावरही झाला होता; पण त्यावेळी गांभीर्याने घेतले गेले नाही, म्हणून हे वाढत गेल्याचे त्यांनी सांगितले.
 
देशामध्ये विरोधी पक्षांनी एकत्र यावे आणि त्या त्या भागामध्ये काम करावे हे ममता बॅनर्जींची भूमिका योग्यच आहे, जेणेकरून जर सत्ताधारी पक्षाला सत्तेवर येण्यापासून दूर ठेवायचे असेल, तर ज्या ज्या भागात विरोधकांचे प्रभुत्व आहे त्यांना त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी इतर पक्षांनी मदत केली पाहिजे, असे मत व्यक्‍त करून आ. भुजबळ पुढे म्हणाले, की महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे सूत्र निश्‍चित झालेले नाही. मात्र आमचे सर्व नेते एकत्र बसतील आणि ते सूत्र निश्‍चित करतील; परंतु याबाबत चे आराखडे बांधले जात आहेत, ज्या अफवा पसरला जात आहेत, त्या अतिशय मनोरंजक असल्याच्या सांगून भुजबळ म्हणाले, की आम्ही एक निकष सर्वत्र लावणार आहे तो म्हणजे ज्या पक्षाला विजयी होण्याची जास्तीतजास्त संधी आहे, त्या पक्षाला ती जागा दिली पाहिजे, यासाठी लवकरच पक्षाचे धोरण महाविकास आघाडी ठरवेल.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साई संस्थानावर नोटबंदीचा परिणाम नाही; दानात 2000 रुपयांच्या नोटांचं प्रमाण अत्यल्प