राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी (11 जून) रोजी भेट झाली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
या भेटीविषयी अधिक माहिती देताना नवाब मलिक म्हणाले, "प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली.
"देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवार यांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल."
दरम्यान, 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी म्हटलं होतं की, "महाविकास आघाडीचं सरकार पुढची 5 वर्षं काम करेल. हे सरकार नुसतं 5 वर्षं नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमानं एकत्र काम करून सामान्य जनतेचं प्रभावीपणानं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही."
याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 जूनला शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट होत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
कोण आहेत प्रशांत किशोर?
प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीकार आहेत. त्यांनी आतापर्यंत देशभरातल्या वेगवेगळे पक्ष आणि त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेसाठी काम केलं आहे.
किशोर यांनी 2014च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. त्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यासाठी काम केलं.
यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केलं.
"पश्चिम बंगालमध्ये भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. जर भाजपला यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम सोडेन," असं प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं.
निवडणूक निकालांनंतर प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला होता. त्यानंतरही त्यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून काम सोडत असल्याचं जाहीर केलं होतं.