Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव
, मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:08 IST)
मुख्य सचिव सीताराम कुंटे हे येत्या ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असून त्यांना तीन महिने मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राला पाठवण्यात आला आहे. कुंटे यांच्या तीन महिन्याच्या मुदतवाढीचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळणे अपेक्षित असून याबाबतचा अंतिम निर्णय आठवडाभरात होईल. सीताराम कुंटे हे १९८५ च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहेत. सीताराम कुंटे यांनी राज्यात आणि मुंबईत कोरोनाचे संकट असताना चोख कामगिरी बजावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक असे सीताराम कुंटे आहेत. सीताराम कुंटे यांनी मुख्य सचिवपदी जबाबदारी स्विकारण्याआधी संजय कुमार यांच्याकडे राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी होती. आता कुंटे यांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने येत्या काही दिवसात राज्याला महिला मुख्य सचिव मिळणार की ठाकरे सरकार आपल्या पसंतीचा अधिकारी याठिकाणी नेमणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अजोय मेहता यांनाही यापूर्वी दोनवेळा मुख्य सचिव पदी मुदतवाढ देण्यात आली होती. अजोय मेहता यांना एकदा सहा महिन्यांची मुदतवाढ, तर दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मे २०२० पर्यंत अजोय मेहता हे मुख्य सचिव होते. त्यानंतर जून २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत संजय कुमार हे मुख्य सचिव होते. तर सीताराम कुंटे हे मार्च २०२१ पासून मुख्य सचिव आहेत. अजोय मेहतांना यांना दोनवेळा मिळालेला मुदतवाढीचा पायंडा कायम ठेवत आता सीताराम कुंटे यांनाही तीन महिन्यांची मुदतवाढ मिळेल असे खात्रीलायकरीत्या समजते. सीताराम कुंटे हे महिन्याच्या शेवटी म्हणजे ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळेच राज्य सरकारच्या विविध विभागात त्यांचा अनुभव पाहता, तसेच मुख्य सचिवपदी त्यांनी सांभाळलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने तीन महिन्याची मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रकडे पाठवला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नव्या वर्षात राज्यात भाजप सरकार येणार : नारायण राणे