नाशिकमधील प्रवरा मेडिकल ट्रस्ट तर्फे देहविक्री करणाऱ्या साठ महिलांना या महिलांवर बेतलेला गंगुबाई कठियावाडी हा चित्रपट दाखविण्यात आला.
देहविक्री करणाऱ्या महिलांच्या जीवनातील, त्यांच्या समस्या, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांचं आकारले जाणारे अस्तित्व आणि तरीही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची जिद्द देणारा गंगुबाई कठियावाडी चित्रपट बघून देहविक्री करणाऱ्या महिला क्षणभर भावुक झाल्या.
जागतिक सेक्स वर्कर्स राईट्स डे (दि.०३मार्च) व जागतिक महिला दिन (०८ मार्च) या निमित्ताने १६ वर्षांपासून या महिलांसाठी काम करणाऱ्या प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. ६० महिलांनी दिव्या ऍडलॅब येथे चित्रपटाचा आनंद लुटला.
चित्रपटाचे कथानक १९६० च्या दशकातील असले तरी या महिलांकडे बघण्याची समाजाची मानसिकता अजूनही बदलली नाही. हा व्यवसाय कायदेशीर असला तरी वस्ती कायदेशीर नसल्याने या महिलांना आजही वस्ती सोडून जावे लागते. समाजातील आव्हानांना तोंड देत अवहेलना सहन कराव्या लागतात, असे या चित्रपटाचे कथानक आहे.