चिपळूणमध्ये आलेल्या पुरामुळे हाहा:कार उडाला आहे. शेतापासून घरांपर्यत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने चिपळूणमधील नागरिक भयभीत झाले आहेत. पावसामुळे चिपळूणचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. वीज नाही, पाणी नाही, अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिेट तातडीने पुरवण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही मागणी केली आहे.
चिपळूणसह कोकणातील अनेक भागात पाऊस-पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतरही माझे सहकारी या भागात दौरे करीत आहेत. पिण्याचे पाणी आणि तयारअन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे. या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे पुरवण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. त्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. यात सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत,असंही त्यांनी सांगितलं.
काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सारे या कुटुंबीयांसोबत आहोत.
महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली.महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पाणी ओसरलं आहे. पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
माणगाव पाचडमार्गे महाड रस्ता, माणगाव महाड महामार्ग, गोरेगाव दापोली रस्ता सुरु झाला आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली. कोंझर पासून पुढे तेटघरपर्यंत रास्ता मोकळा करण्यात आला आहे. तेटघरपासून पुढे मोहोप्रेमार्गे आचळोलीकडून नातेखिंडला पोहोचता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
स्वयंसेवी संस्थांना आवाहन
माणगाव येथे सुमारे २००० फुड पॉकेट्स तयार आहेत. अजून २००० अन्नाची पाकिटे तयार होतील.याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत. माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे.स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी, असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितलं.
आरोग्य यंत्रणा सज्ज
महाडमधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.बाटू लोणेरे येथे एक वैद्यकीय पथक सज्ज असून त्यांच्याकडे रुग्णवाहिका व इतर सामग्री आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.एमआयडीसीचे अग्निशामक दलदेखील मदत कार्यात उतरले आहे.