रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एक विचित्र घटना घडली. एका महिलेनं आपल्या 6 मुलांसह विहरीत उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील सर्व 6 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सहाने दाम्पत्यांमध्ये झालेल्या घरघूती भांडणानंतर आईने आपल्या 5 मुलींसह 1 वर्षाच्या मुलाला घेऊन विहरीत उडी घेतली होती. या घटनेत महिला बचावली, मात्र तिच्या 6 मुलांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील ढालकाठी बिरवाडी गावात ही घटना घडली आहे. घरघुती वादातून होणाऱ्या अशा घटना दिवसेंदिवस वाढत जात असून, अनेकदा मुलगी झाल्याच्या कारणावरुन कुटुंबात वाद होत असल्याचं समोर आलं आहे. अशाच वादातून ही घटना घडल्याचं समजतंय. कुटुंबात नेहमी होणाऱ्या वादाला कंटाळून या महिलेने आपल्या 5 मुली आणि एका मुलाला घेऊन थेट घराजवळच्या विहरीत उडी घेतली. विहरीत उडी घेतल्यानंतर पोहता न आल्यानं मुलांचा मृत्यू झाला असून, महिलेचा जीव मात्र वाचला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु केलं. रात्री उशीरापर्यंत हे काम सुरु होतं.