Publish Date: Mon, 16 Mar 2026 (15:05 IST)
Updated Date: Mon, 16 Mar 2026 (15:07 IST)
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, १७ ते २० मार्च २०२६ या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ही स्थिती अवकाळी पावसाची असून काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज आणि यलो अलर्ट
प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तर १८ आणि १९ मार्च रोजी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने या भागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड (मराठवाडा)
गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ (विदर्भ)
तसेच काही ठिकाणी सोलापूर, सांगली, सातारा येथेही पावसाची शक्यता.
१८ ते २० मार्च दरम्यान परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. या काळात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही.
पावसाची प्रमुख कारणे
उत्तर भारतातून येणारा पश्चिमी विक्षोभ आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या संयोगामुळे महाराष्ट्राच्या हवामानात हा बदल झाला आहे.
सध्या राज्यातील तापमान ४०°C च्या वर गेल्यामुळे हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी वादळी पाऊस हजेरी लावू शकतो.
शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. सध्या गहू, हरभरा आणि फळबागांची काढणी सुरू आहे. काढलेला शेतीमाल ताडपत्रीने झाकून ठेवावा किंवा सुरक्षित स्थळी हलवावा. तसेच बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेला माल पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. पाऊस सुरू असताना झाडाखाली किंवा उघड्यावर आश्रय घेणे टाळावे, कारण विजा पडण्याचा धोका जास्त असतो.
तापमानातील बदल
पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात २ ते ४ अंशांची घट होऊ शकते.
Edited By- Dhanashri Naik