Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पावसाचा जोर वाढला, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

राज्यात पावसाचा जोर वाढला, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
, शुक्रवार, 18 जून 2021 (08:07 IST)
राज्यात पावसाचा जोर वाढला असून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस बरसत आहे. तळकोकणाला तर पावसाने झोडपून काढले आहे, तर कोल्हापुरातील पंचगंगा नदी पात्राबाहेर आल्याने गावातील लोकांना धोका देण्यात आला आहे. येत्या 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, साताऱ्यासह, रत्नागिरीला रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळीही तीन फुटांवर गेली असून नदीचे पाणी पात्राबाहेर आलं आहे. जिल्ह्यातील 53 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून काही मार्गावरील वाहतूकदेखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 17 फुटांनी वाढ झाल्याने, नदीतील मंदिरं आता पाण्याखाली गेली आहेत. शिवाय आजूबाजूच्या शेतातदेखील पाणी शिरायला सुरूवात झाली आहे. नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
मुंबई ,ठाणे, विरार या भागातही तुफान सरी कोसळत आहेत. ठाण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस आहे. तर विरारमध्येही फुलपाडा डॅमवरून चरण्यासाठी जाताना मोठ्या नाल्यात तीन म्हशी वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत सासुपाडा परिसरात मुख्य रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे मुंबई आणि गुजरात लेनवर जाणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वसई विरार परिसरात पावसाचा जोर सुरूच आहे. डोंगरावरून येणारे पाणी महामार्गावर आल्याने सासुपाडा परिसरात पाणी साचले आहे.
 
कोकणात अलर्ट जारी
 
रत्नागिरी धुवाधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी झालेली पहायला मिळाली. रात्रभर बरसल्यानंतर जिल्ह्यात सकाळी पावसाने विश्रांती घेतली होती.  पुढील तीन दिवसांसाठी हवामान खात्याने कोकणाला अलर्ट दिलाय. मध्यरात्री कोसळणाऱ्या पावसानं नद्याच्या पाणी पातळीत वाढ झालीय. जगबुडी ६ मिटर, वाशिष्ठी ५ मिटर,कोदावली५ मिटरची पातळी आहे.गेल्या चौविस तासात ८३ मिलिमिटर पावसाची नोंद खेड १६५ मिलिमिटर,संगमेश्वर १०२ लांजा ८७ राजापूर ८५ तर चिपळूणाक ८४ मिलिमिटर पाऊस झालाय. ४५४ मिलिमिटरची सरासरी गाठलीय.
 
सिंधुदुर्गात गेले चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तीन धरणे तुडुंब भरून गेली आहेत. तर नऊ धरणांमध्ये पन्नास टक्क्याहून जास्त पाण्याचा संचय झाला आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात सरासरी 432 मीमी पाऊस पड़ला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत असताना, तीन लघु पाटबंधारे प्रकल्पात 100 टक्के पाण्याचा संचय झाला आहे. सिंधुदुर्गात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.या मुसळधार पावसाने देवगड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले.मागील 24 तासात देवगडला 87 मिमी पाऊस पडला तर गेल्या तीन दिवसांत देवगड तालुक्यात सरासरी 326 मिमी पाऊस कोसळला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रायगड येथे उभारणार बल्क ड्रग पार्क – : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे