राज्यात अनेक महत्त्वाच्या महानगर पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील कंबर कसल्याचं दिसून येत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंसोबत मुंबईत बैठक झाली. त्यानुसार येत्या १४ डिसेंबरपासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून राज्याच्या ६ विभागांमध्ये ६ बैठका घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. त्यासोबतच, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पूर्ण झाल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.
“राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात आगामी नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांबाबत चर्चा झाली. त्यात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबतही चर्चा झाली. त्यानुसार १४ डिसेंबरला मराठवाड्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची संभाजीनगर-औरंगाबादमध्ये बैठक होईल. संध्याकाळी राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलतील”, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.