आम्ही लोकांसाठी कामे करूनही हारलो मात्र, ज्यांनी लोकांना पैसा वाटला त्यांना जनतेने जिंकून दिले. अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. गेली पाच वर्षे मनसेने भरपूर कामे केली, तरीही मनसे हारली. तर, काही ठिकाणी नावेही माहिती नसणारे लोक केवळ पैशाच्या जोरावर निवडून आले. त्यामुळे जनतेनेच आम्हाला आता कसे लढायचे हे शिकवले, असे राज यांनी यावेळी म्हणाले. मनसेचा 11 व्या वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
मुंबई महापालिकेत मनसेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर त्यांनी निवडणुकांनंतर पहिल्यांदाच आपली भुमिका मांडली. गेली पाच वर्षे मनसेचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेच्या कामी आले परंतु त्यांना निवडून न देता केवळ ज्या लोकांनी पैसा वाटला त्या लोकांना जनतेनी निवडून दिले. निवडणुकांमधील यंदाचा पराभव हा शेवटचा पराभव असून यापूर्वी आपण सौम्य धोरणांचा वापर करून निवडणुकांना सामोरे गेलो, यापुढे जनतेने यंदा जसे लढायला शिकवले त्याप्रमाणे लढणार. त्यामुळे यापुढे परावभव दिसणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये नाशिकमध्ये आम्ही भरपूर कामे केली, बाहेरुन पैसा आणून नाशिक शहराचा कायापालट केला. परंतु नाशिकच्या लोकांनी मात्र बाहेरुन आलेल्या लोकांना निवडून दिले. तुमच्या या पायंड्यामुळे तुमचेच भविष्यात नुकसान होणार आहे असे ही त्यांनी सांगितले.