राज ठाकरे यांचा सरकारवर हल्ला : अनिल अंबानींसाठी देश विकायला काढलाय का?

गुरूवार, 8 नोव्हेंबर 2018 (08:57 IST)
वाघिणीच्या मृत्यूच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. अनिल अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का? असा सवाल राज यांनी पत्रकार परिषदेत सरकारला विचारला आहे.
 
अवनी वाघिणीला मारायची गरज नव्हती, तिला बेशुध्द करायला हवे होते. पुतळे उभारुन वाघ वाढत नाहीत असेही ते म्हणाले. वाघिणीला बेशुध्द करुन संवर्धन करता आले असते. जी गोष्ट तुम्हाला वाचवता आली असती, ती तुम्ही वाचवली नाही. इतर आयुधे आपल्याकडे आहेत. तिला बेशुध्द करुन संवर्धन करता आले असते असे राज यांनी म्हटले आहे.
 
अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर मुनगंटीवार बेफ्रिकीरीपणे उत्तर देत आहेत. ते वनमंत्री आहेत, याचा अर्थ त्यांना वनातले सगळे कळते किंवा त्यावर ते रिसर्च करत होते, असे नाही. ते आता मंत्री झाले आहेत, उद्या मंत्रिपद जाईल. त्यामुळे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारीने बोलावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
 
वाघिणीचे दोन बछडे सापडत नाहीत. ती कुठे असतील. म्हणजे एक जीव गेलाय, त्यासोबत आणखी दोन जीव जाणार. यांना सत्तेचा माज आला आहे. आम्ही काहीही केले तरी आम्हाला काही होणार नाही. मला वाटतेय घोडौदान जवळ आहे. यांचा माज उतरणे अत्यंत आवश्यक आहे, असेही राज म्हणाले.
 
वाघिणीला जिथे मारले तिथून 60 किमी अंतरावर अनिल अंबानींचा प्रकल्प येत आहे. अनिल अंबानीसाठी देश विकायला काढलाय का? असा सवाल तंनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख द्रविड सारखा संयम दाखवा आर.बी.आय. ला रघुराम राजन यांचा सल्ला