Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजेश टोपेंना मोदींच्या बैठकीत बोलण्याची संधी मिळाली नाही

राजेश टोपेंना मोदींच्या बैठकीत बोलण्याची संधी मिळाली नाही
, शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (18:22 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहिले नव्हते. त्यांच्याऐवजी आरोग्य मंत्री राजेश टोपे बैठकीला हजर होते. पण त्यांना या बैठकीत बोलण्याची संधीच मिळाली नाही.
त्यामुळे बैठकीअखेर राजेश टोपेंना महाराष्ट्राची बाजू केंद्राला लेखी कळवावी लागली. त्यामुळे महाराष्ट्राला थेट मोदींकडे आपली बाजू मांडता आली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.
 
प्रकरण काय?
देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यात काय स्थिती आहे आणि काय उपाययोजना सुरू आहेत याचा आढावा घेण्यासाठी नरेंद्र मोदींनी सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नव्हते. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती.
मात्र, त्याचं नेमकं कारण स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. गेल्या तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. मानेच्या त्रासामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 10 नोव्हेंबरला ते रूग्णालयात दाखल झाले होते.
त्यानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहीले नाहीत. ते हिवाळी अधिवेशनातही तब्येतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नव्हते.
मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांनी राज्याच्या अनेक बैठकांना आणि विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीला व्हीडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. तसंच सध्याही ते अशा बैठकांना व्हीडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतायत
पण नरेंद्र मोदींच्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती देताना त्यामागचं कारण स्पष्ट केलं नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. मात्र त्यांना या बैठकीत बोलता आलं नाही.
याबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. सलग 2/3 तास त्यांना एका जागी बसणं शक्य नव्हतं. पंतप्रधानांनी 8 मुख्यमंत्र्यांना बोलू दिलं पण मला प्रत्यक्ष बोलून बाजू मांडायची संधी मिळाली नाही म्हणून आम्ही राज्याची बाजू केंद्राला लेखी सादर केली."
मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केलीय.
यावर बोलताना टोपे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना तब्येतीमुळे अडचणी असतील म्हणून ते अनुपस्थित होते. ते काळजी घेत आहेत, पण काम करत आहेत. अनेक बैठकींना ते उपस्थित होते. त्याबद्दल कोणी टिप्पणी करू नये."
मात्र, मुख्यमंत्री मोदींच्या बैठकीत अनुपस्थित राहिले आणि त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंना महाराष्ट्राची बाजू मांडण्याची संधी न मिळाल्याने याबद्दल राज्याचं प्रतिनिधित्व कमकुवत होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिर्याणीवरून तुंबळ हाणामारी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात