जालना : औरंगाबादनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जालना नगर परिषदेवर जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी खोतकर आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्यावर घणाघात केला.
ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. रावसाहेब दानवे म्हणाले की, ते मंत्री असताना त्यांनी पाच वर्षात काय केलं हे सांगावे. त्यांची समोरासमोर येऊन टीका करण्याची हिम्मत नाही. माझ्यावर टीका करण्यासाठी सिल्लोडचा औरंगजेब भाड्यानं लावून दिला आहे, अशी घणघाती टीका त्यांनी अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. तर निवडणूक आली की या दोघांनाही मी खिशात घालतो, असेही दानवेंनी म्हंटले होते.
तर, याआधी जालन्यात भाजपची काँग्रेससोबत नगरपरिषदेत 5 वर्ष गळाभेट आणि आता विरोध ही चांगली गोष्ट. असो भाजपच्या जल आक्रोश मोर्चाचं स्वागत, अशी उपहासात्मक टीका अर्जुन खोतकर यांनी आजच्या भाजप जल आक्रोश मोर्चावर केली होती.
दरम्यान, जालाना जल आक्रोश मोर्चा दरम्यान भाजपकडून आगामी नगर परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या भाजपच्या जलआक्रोश मोर्चात भाजप मोठं शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.