Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्र्यंबकेश्वर येथे रथोत्सव उत्साहात संपन्न; सोहळा बघण्यासाठी भाविकांची गर्दी

trayamkeshwar
, मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (08:13 IST)
रांगोळ्यांची सजावट, फुलांचे गालीचे, बॅण्डचा निनाद, फुलांची उधळण, वाजंत्रीचे सुर, पांचजंन्याचा धीरगंभीर स्वर आणि भगवान त्र्यंबक राजाच्या जयघोषात त्र्यंबकेश्वरचा रथोत्सव सोहळा मोठया उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला हा नयनरम्य सोहळा बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. भगवान त्र्यंबकेश्वराचा रथ सोहळा हे त्र्यंबक नगरीचे वैभव आहे. सर्वत्र दिपोत्सवाची सांगता झाली असली तरी त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत त्र्यंबकेश्वरचा दिपोत्सव सुरू असतो. दिवाळी पासुनच ग्रामवासीय रथोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात.
 
रविवारी रात्री ११ ते उत्तर रात्री १.३० वाजेपर्यंत वैकुंठ चतुर्दशीची विशेष महापूजा, पालखी सोहळा व हरिहर भेट सोहळा संपन्न झाला. सोमवारी चतुर्दशीच्या दिवशी सरदार विंचुरकर यांच्या वतीने देवस्थानतर्फे दु. १ ते १.३० पर्यंत महापूजा संपन्न झाली. तसेच मंदिरा समोर ध्वजस्तंभ पुजन झाले. दुपारी ठिक ४.३० वाजता भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा वाजतगाजत मंदिराबाहेर पालखीतुन आणुन रथात विराजमान करण्यात आला.
webdunia
पेशव्यांचे सरदार रघुनाथ विंचुरकर यांनी ३ नोव्हेंबर १८६५ ला हा रथ देवस्थानास दिला होता. संपूर्ण शिसवी लाकडात बांधलेल्या या रथासाठी त्या काळी १२ हजार रुपये खर्च आला होता. जयपूर येथील माणिकचंद रजपूत यांनी हा रथ तयार केला होता. पेशव्यांचे सरदार विंचुरकर यांचे वतीने त्यांचे उपाध्ये रविंद्र अग्निहोत्री यांचे हस्ते भगवान त्र्यंबकेश्वराची व रथाची पुजा व आरती करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश विकास कुलकर्णी. विश्वस्त प्रशांत गायधनी, दिलीप तुंगार, डॅा. सत्यप्रिय शुक्ल, अॅड. पंकज भुतडा, संतोष कदम, भुषण अडसरे, तृप्ती धारणे, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, अमित टोकेकर, रशवी जाधव, अमित माचवे, विजय गंगापुत्र आदि मान्यवर उपस्थित होते. रथाला तीन बैलजोडया जोडण्यात आल्या. आणि रथ मंदिरा समोरून हलला. सर्वात पुढे धर्म ध्वजाधारक, त्यामागे बॅण्ड पथक, त्यामागे चांदीचा मुखवटा ठेवलेली पालखी, त्यामागे वाजंत्री पथक, त्यामागे पानाफुलांनी व आकर्षक विद्युत रोषणाई केलेला रथ, त्यामागे ग्रामस्थ, भाविक अशी भव्य शोभायात्रा मेन रोड मार्गे ठिक ५ वाजता कुशावर्त चौकात पोहोचली. कुशावर्त तिर्थावर वेदमुर्ती रविंद्र अग्निहोत्री यांनी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची अभिषेक पुजा केली. शागिर्द म्हणुन यज्ञेश कावनईकर व अजिंक्य जोशी यांनी सेवा बजावली. पुजा संपन्न झाल्यानंतर पुन्हा मुखवटा रथात विराजमान करून परतीचा प्रवास सुरू झाला. संपूर्ण रथमार्गावर भव्य व आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच स्वयंसेवी संस्थांनर्फ भव्य फुलांचे गालीचे तयार करण्यात आले होते. मृत्युंजय प्रतिष्ठाण व नगरसेविका शितल कुणाल उगले यांचे वतीने तिन ठिकाणी ऑईलपेंटच्या सहाय्याने रांगोळी काढण्यात आली होती. यावरून रथ मार्गस्थ झाला. सायंकाळच्या वेळी आकर्षक रोषणाईमुळे रथाचे सौदर्य अधिकच खुलून दिसत होते. रथा समोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. रथ मंदिरासमोर आल्यानंतर भगवान त्र्यंबकेश्वराचा मुखवटा पालखीतुन मंदिरात नेण्यात आला. मंदिराच्या प्रांगणातील दिपमाळीची विधिवत पुजा करून दिपमाळ प्रजल्वीत करण्यात आली. पुजेचे पौरोहित्य श्रीमंत पेशव्यांचे वंशपरंपरागत तिर्थोपाध्ये वेदमुर्ती दिलीप रुईकर व ओंकार रुईकर यांनी केले. यावेळी त्रिपुरवाती जाळण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. आकर्षक रोषणाई व त्रिपुरवातींच्या उजेडात मंदिर अधिकच सुंदर दिसत होते. भाविकांच्या गर्दीने मंदिर तुडूंब भरले होते. हा सोहळा बघण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. रथोत्सवाची सांगता देवस्थान तर्फे पेढे वाटप करून करण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, पो.नि. संदिप रणदिवे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. अश्वीनी टिळे, चंद्रभान जाधव, राणी डफळ व सहकार्‍यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढलं