Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुहेरी हत्याकांडाने चौल हादरले; सख्ख्या भावाने केली दोन बहिणींची हत्या

murder
अलिबाग , गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (07:36 IST)
मालमत्ता आणि अनुकंपावर मिळालेल्या नोकरीच्या वादातून सख्ख्या भावाने दोन बहिणींची जेवणात विष घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना चौल येथे उघडकीस आली आहे. या नराधम भावाला रायगड पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  या दुहेरी हत्याकांडाने चौल हादरला आहे.
 
सोनाली शंकर मोहिते (वय 34, रा. भोवाळे, पो.चौल, ता.अलिबाग) आणि स्नेहा शंकर मोहिते (वय 30) अशी मृत बहिणींची नावे आहेत. मुलींच्या मृत्यूनंतर आई जयमाला शंकर मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीनंतर रेवदंडा पोलिसांत अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीने पोलीसही चक्रावले.
 
रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची सविस्तर माहिती दिली. गणेश मोहिते याचे वडील शंकर मोहिते वन विभागात अधिकारी म्हणून सेवेत असताना मयत झाले होते. त्यानंतर मिळणार्‍या अनुकंप तत्वावरील नोकरीवरुन तसेच मालमत्तेच्या हिश्श्यावरुन गणेश आणि त्याच्या दोन बहिणींमध्ये वाद सुरु होता.
 
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून, गणेश बहिणींशी जुळवून घेऊ लागला. भांडणे व्हायची बंद झाली. गणेश सुट्टीत घरी यायचा. स्वतःच्या हाताने बहिणींना सूप बनवून पाजायचा. आरोग्यासाठी सूप चांगले असल्याचे त्याने बहिणींना पटवून दिले होते. त्यामुळे कोणाला गणेशचा संशय आला नाही. गणेशच्या डोक्यात मात्र कट शिजत होता.
 
अजय देवगण याच्या दृष्यम् सिनेमातील स्टोरीला मिळतीजुळती स्टोरी त्याने रचायला सुरुवात केली होती. त्याचाच भाग म्हणून तो सूप बनवून पाजत असे. 15 ऑक्टोबर रोजी त्याने नेहमीप्रमाणे सूप बनवले आणि दोन्ही बहिणींना दिले. त्यानेही सूप पिण्याचे नाटक केले आणि बाहेर निघून गेला.
 
सोनाली आणि स्नेहाला त्याने सूपमधून उंदीर मारण्याचे विष दिले होते. ते प्यायल्यानंतर दोघींनाही उलट्यांचा त्रास सुरु झाला. गणेशला फोनवरुन माहिती देण्यात आली. या दोघींनाही अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गणेशला या दोघींना वाचवण्यात काडीचाही रस नव्हता. त्याचे लक्ष आईकडे होते. बहिणींना काकीनेच काही तरी केल्याचा पाढा तो आईला पढवत होता. पाण्यातून विष दिले असणार, हेच तो बिंबवत होता.
 
16 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान सोनालीचा तर 17 ऑक्टोबर रोजी स्नेहाचा मृत्यू झाला. यानंतर रेवदंडा पोलीसात आई जयमाला मोहिते यांनी तक्रार दिली. दोन्ही मुलींना तिच्या काकीनेच मारल्याचे तक्रारीत नमूद केले. त्याद्वारे पोलिसांचा तपास भरकटवण्याचा गणेशचा डाव यशस्वी होताना दिसत असतानाच, तपासात रायगड गुन्हे अन्वेषण शाखेची एन्ट्री झाली. पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांनी सुत्रे हातात घेतली.
 
स्नेहाने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबात भावाने त्यांना सूप दिल्याची दिली होती. मात्र त्यातूनच विष दिले गेले आहे याची कल्पना तिला नव्हती. काकीने पाण्यातून काहीतरी दिल्यामुळे असे झाल्याचे गणेशने तिलादेखील सांगितले होते. त्यामुळे पोलीसांना नेमके काय होतेय याची स्पष्टता येत नव्हती. तोपर्यंत सख्खा भाऊ दोन बहिणींना मारेल, असे पोलिसांना वाटण्याचे कारण नव्हते.
 
काकीने पाण्यातून काहीतरी दिल्याची तक्रार होती. मात्र त्या दोघी तर शेवटच्या सूप प्यायलेल्या. दुवा काय जमत न्हवता. पोलिसांचे चक्र सुरु झाले. पाण्यातून विष दिले मग आई?... तिनेदेखील त्याच भांड्यातून पाणी प्यायले होते की... संशय आणि शेकडो प्रश्न डोक्यात घेऊन पोलीस कामाला लागले. शेवटी गणेशने रचलेला डाव पोलिसांनी उलथवून टाकला होता.
 
पोलिसांनी बोलत्या पोपटाची गोष्ट सांगितल्यानंतर गणेश पोपटासारखा बोलू लागला. त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. वडीलांच्या निधनानंतर बहिणींची लग्न होतील आणि सर्व प्रॉपर्टी त्याला मिळले, असा गणेशचा अंदाज होता. मात्र बहिणी लग्न करत नव्हत्या आणि गणेशची डाळ शिजत नव्हती. विशेष म्हणजे वडीलांच्या मृत्यूनंतर आपण वारस असल्याचे सांगूनच गणेशने त्यांच्या जागी नोकरी मिळवली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिनेट निवडणुकीसंदर्भात चौकशी अहवाल आला समोर; आशिष शेलारांना धक्का