यंदाच्या गणेशोत्सवात लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या देणगीमध्ये घट झाली आहे. मागच्यावर्षी रोख रक्कमेच्या स्वरुपात मंडळाकडे ६.५५ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा हा आकडा ५.०५ कोटी रुपये आहे अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली. मात्र लाडू विक्रीचा हवाला देऊन यंदा गणेश भक्तांची संख्या वाढल्याचा दावा त्यांनी केला. गेल्यावर्षी आम्ही १.६२ लाख लाडू विकले होते. यंदा १.८६ लाख लाडूंची विक्री झाली. यावरुन भक्तांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होते असे साळवी म्हणाले.
२०१८ मध्ये गणेश भक्तांनी लालबागच्या राजाला पाच किलो सोने आणि ८० किलो चांदी अर्पण केली होती. यंदा भाविकांनी ३.७५ किलो सोने ५६.७ किलो चांदी अर्पण केली. यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेल्या विविध वस्तूंचा लिलाव करुन मंडळाला आतापर्यंत १.२५ कोटी रुपये मिळाले आहेत. मागच्यावर्षी लिलावातून १.०९ कोटी रुपये जमा झाले होते. दरवर्षी गणेशभक्त मोठया प्रमाणात लालबागच्या राजाला रोख रक्कम व सोने-चांदी अर्पण करतात. पण यंदा मंदी आणि पावसाचा फटका बसल्याचे सुधीर साळवी यांनी सांगितले.