औरंगाबाद येथे एक धक्कादायक घटनेत प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय मुलीची हत्या केल्याचे समोर येत आहे. मृत मुलीचे नाव किशोरी मोटे असे आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतले आहे.
2016 साली आलेल्या सुपरहिट सैराट चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे. येथे लाडगाव शिवारात ही घटना घडली आहे.
कोयत्याने केली हत्या
सहा महिन्यापूर्वी 19 वर्षीय किशोरीने पळून पुण्यातील आळंदी येथे प्रेमविवाह केला. नंतर ते औरंगाबादेतील लाडगाव या परिसरात राहण्यासाठी आले होते. याची माहिती मिळताच किशोरीचा भाऊ संकेत मोटे हा लाडगावला आला आणि बहिणीला पळून प्रेमविवाह केल्याबद्दल जाब विचारु लागला. त्यांच्यात शाब्दिक वादानंतर राग अनावर झालेल्या भावाने कोयत्याने सख्या बहिणीवर सपासप वार केला. आरोपी अल्पवयीन असून मुळचा गोयेगाव येथील रहिवाशी आहे.
प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी तो आईसोबत लाडगावला आला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात कोयत्याने बहिणीचा गळा चिरला. हा भयानक प्रकार पाहून किशोरीच्या पतीने पळ काढला. शेजारील लोकांना या घटनेची माहिती पोलिसांत दिली. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी भाऊ आणि आईला ताब्यात घेतले आहे.