Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सामनाच्या अग्रलेखातून केजरीवालांचे कौतुक, भाजपवर टीका

सामनाच्या अग्रलेखातून केजरीवालांचे कौतुक, भाजपवर टीका
आपच्या विजयावर शिवसेनेने सामना अग्रलेखातून अरविंद केजरीवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, भाजप, हिंदू-मुसलमान पाकिस्तान वैगरे बोंबलत बसले. पण, शेवटी विजय केजरीवाल यांच्या आपचा झाला, असं म्हणत सामनातून भाजपवर टीका केली आहे. 
 
“केजरीवाल यांनी केलेल्या कामाच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली. केजरीवाल यांचा दिल्ली प्रदेश हा केद्रंशासित असल्याने कायदा सुव्यवस्था पोलिस, उद्योग हे विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत. त्याचा त्यांना फयदाच झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ बारा वाजले व त्याचे खापर मोदी शहांवर फोडण्यात ते यशस्वी झाले. पण पाणी आणि वीज बिला माफीचे संपुर्ण श्रेय त्यांनी घेतले. भाजप, हिंदू-मुसलमान पाकिस्तान वैगरे बोंबलत बसले. पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या आप चा झाला. आपमतलब्यां चा पराभव झाला.”
 
“झारखंडमध्ये पराभव झाला व ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे गेले. देशाच्या राजधानीवर ‘आप’चा झेंडा फडकला, तर आर्थिक राजधानीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्य करीत आहे. हा बाण काळजात आरपार खुपणारा आहे. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर भाजपला एकापाठोपाठ एक राज्ये गमवावी लागली आहेत. चार महिन्यांपूर्वी दिल्लीतील सातपैकी सात लोकसभा जागांवर भाजपचा विजय झाला तो पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा होता. मोदी किंवा भाजपसमोर एखाद्या पक्षाचे किंवा नेत्याचे तगडे आव्हान नव्हते. त्यामुळे भाजपचा एकतर्फी विजय झाला. पण विधानसभा निवडणुकीत एकीकडे राज्यांतील तगडे नेतृत्त्व आणि त्यांच्यासमोर मोदी आणि शाहांची ‘हवाबाज’ नीती फोल असे चित्र निर्माण झाले आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल पाहिला तर एकटे केजरीवाल हे संपूर्ण केंद्र सरकार व शक्तिमान भाजपला भारी पडले आहेत”, असं म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला.
 
“केजरीवाल यांच्या पराभवासाठी भाजपने देशभरातील अडीचशे खासदार, दोन-चारशे आमदार, मुख्यमंत्री तसेच राज्यांचे मंत्री व संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ मैदानात उतरवले होते, पण त्या सर्व फौजांचे शेवटी दिल्लीच्या मैदानावर साफ पानिपत झाले. अहंकार, मस्तवालपणा आणि ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीचा हा पराभव आहे”, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.-

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक दुष्कर्म