खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी विशेष न्यायालयाच्या परवानगी नंतर सचिन वाजे याला भिवंडीच्या एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले आहे.या रुग्णालयात सचिन वाजे याच्या हृदयावर शस्त्रक्रिया होणार आहे. स्थानिक पोलिसाकडून या रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे हा तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.सचिन वाजे याच्या छातीत दुखु लागल्यामुळे मागील १५ ते २० दिवसापासून त्याच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु होते.सचिन वाजे याच्या हृदयात ३ मोठे ब्लॉक निघून आल्यामुळे त्याला शत्रक्रियेची गरज असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते.
दरम्यान सचिन वाजे यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात येणार आहे, मात्र ही शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करण्यात यावी यासाठी सचिन वाजे याने विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून परवानगी मागितली होती. दरम्यान या अर्जावर सोमवारी न्यायालयात सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वाजेला याबाबट आपले मत विचारले असता त्याने केवळ माझा फादर स्टेन स्वामी होऊ नये ही इच्छा आहे एवढेच न्यायालयत म्हटले होते.त्याच्या या बोलण्याने न्यायालयातील वातावरण काही वेळासाठी गंभीर झाले होते.त्यानंतर न्यायालयाने त्याला खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली, मात्र ही शस्त्रक्रिया स्वखर्चाने करावी असे न्यायालायने म्हटले होते.