विराराच्या ओम साईधाम ट्रस्टने शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती साईबाबा संस्थानाला चक्क देणगी म्हणून अर्पण केल्या आहेत. या दोन इमारतींची किंमत ३२ कोटी रूपयांहून अधिक असून साईबाबा चरणी अर्पण झालेली आजवरची ही आलेली दुसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी देणगी आहे.
पालघरच्या काशिनाथ गोविंद पाटील यांनी त्यांच्या नावावरील एकूण ९७८२.४४ चौरस मीटर बांधीव क्षेत्र असलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती गुरुवारी साईचरणी अर्पण केल्या. या इमारतींची सरकारी दराप्रमाणे किंमत ३२ कोटी २७ लाख १३ हजार रुपये आहे. या दानपत्रासाठीचे १ कोटी ६३ लाख रुपये इतके नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संस्थानने भरले आहे.
डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील संस्थानाचे व्यवस्थापन मंडळ या इमारतीत राज्यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आय. ए. एस. अकादमी सुरु करणार आहे. या ओम साईधाम मंदिर ट्रस्टने शिर्डीला येणाऱ्या पदयात्रींसाठी शिर्डीजवळ २००८ मध्ये साईपालखी निवारा उभारला आहे. याठिकाणी पदयात्रींना निवास आणि भोजनाची मोफत सेवा पुरवण्यात येते.