Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

औरंगाबादमध्ये निर्बंध काळात सलून उघडले, मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू

औरंगाबादमध्ये निर्बंध काळात सलून उघडले, मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू
, गुरूवार, 15 एप्रिल 2021 (08:33 IST)
राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात निर्बंधानुसार फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, या नियमांच्या विरुद्ध जाऊन औरंगाबादेत एका सलून व्यवसायिकाने सलून उघडलं. त्यामुळे पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबियांनी केला आहे.
 
औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात संबंधित घटना घडली. मृतक फिरोज खान याने आज सकाळी सलून उघडले होते. मात्र, महाराष्ट्रातील कडक निर्बंधांनुसार सर्व सलून बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उस्मानापुरातील सलून व्यवसायिकाने सलून उघडल्याची पोलिसांना माहिती मिळाली. दोन पोलीस कर्मचारी सलूनवर पोहोचले. त्यांनी सलून चालकाला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत त्याचा दुर्देवी मृत्यू झाला, असा आरोप उस्मानापुरा परिसरातील नागरीक आणि मृतकाच्या कुटुंबियांनी केला आहे.
 
पोलीस ठाण्याबाहेर मृतकांच्या नातेवाईकांचा ठिय्या
 
सलून चालकाच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले. ते सलून चालकाचा मृतदेह घेऊन उस्मानापूर पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले. तिथे त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. सलून व्यवसायिकाची हत्या करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी आणि उस्मानापूर परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं.
 
अखेर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. या प्रकरणातील संबंधित दोन पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षकांना याबाबत कडक सूचना देण्यात आल्या. तसेच मृतकाच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करु, असं आश्वासन आयुक्तांनी जमावाला दिला. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल देशमुखांची साडेआठ तास सीबीआयकडून झाडाझडती