मागच्या काळात केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारने केलेल्या कामांना दाद देत लातूर जिल्ह्यातल्या मतदारांनी जिल्हा परिषदेत परिवर्तन केलं. भाजपा कार्यकर्त्यांनी केलेली मेहनतही याला कारणीभूत आहे. लातुरात एककेंद्री सत्ता होती. आता प्रत्येकाला बोलण्याचा वाव मिळतो आहे यामुळेच जिल्हा परिषदेत आम्हाला यश मिळालं असा दावा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण असेल याबद्दल उत्सुकता आहे. याबद्दल विचारणा केली असता, पूर्वी बोलल्याप्रमाणे शेतकरीच असेल, अनुभवी असेल आणि उच्च विद्याविभूषित असेल असं ते म्हणाले. रामचंद्र तिरुकेंना संधी मिळेल का असे विचारले असता हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, सोशल मिडीयावर जी चर्चा सुरु आहे त्यानुसार अध्यक्ष कसा ठरेल असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीचा मुद्दा विरोधकांनी उचलला होता, त्याला मतदारांनीच चोख उत्तर दिले, मार्च अखेर नव्याने निवडून आलेल्या नगरपरिषद आणि जिल्हा परिषद सदस्यांची चार दिवसांची कार्यशाळा घेतली जाईल. यात लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे याबाबत विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करतील. कॉंग्रेसची एककेंद्री सत्ता लोकांनी नाकारली आहे. प्रचाराच्या काळात विरोधकांनी बालक मंत्री अशी संभावना केली. पण बालकही नको अन पालकही नको मी फक्त सेवक आहे अशी कोटी पाटील यांनी केली.