ऐतिहासिक किल्ले पन्हाळागडाचे जतन, संवर्धन होत नाही. केंद्रीय पुरातत्व विभागासह प्रशासनानाचे दुर्लक्ष झाल्याने या गडाची तटबंदी, बुरूज ढासळू लागले आहेत. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने या पन्हाळगडाला वाचविण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून संभाजीराजे यांनी पन्हाळा गडावरील दूरवस्था आणि गंभीर स्थिती मांडली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः जातीने या प्रकारात लक्ष घालावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
संभाजीराजे यांनी पत्र म्हटले आहे की, महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्टय़ा सर्वात महत्वाच्या अशा तीन राजधानीच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत आहे. पावसामुळे किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगाही पडत आहेत.