Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समृद्धी महामार्ग : 'मृतदेह ढिगा-याखाली होते, त्यांचे फोन वाजल्याने मदत झाली'

समृद्धी महामार्ग : 'मृतदेह ढिगा-याखाली होते, त्यांचे फोन वाजल्याने मदत झाली'
, मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (23:39 IST)
social media
"रात्री अकरा साडे अकरा वाजले होते. गावातले लोक झोपले होते. मी आणि काही जण घराबाहेर बसलो होतो. आम्हाला अचानक मोठा आवाज आला आणि आमच्या डोळ्यादेखत पत्त्यांचा बंगला पडावा तसा काही सेकंदात समोरच्या पुलाचं बांधकाम कोसळलं."
 
शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाचे रहिवासी दीपक अधिकारी यांनी आपल्या डोळ्यासमोर पुलाचं बांधकाम सुरू असताना क्रेन कामगारांवर कोसळताना पाहिली.
 
31 जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम शहापूर तालुक्यात सुरू असताना एक भीषण अपघात घडला.
 
गर्डर बसवण्यासाठी दुस-या दिवशीची पूर्व तयारी करत असताना क्रेन खाली कोसळली आणि यात 20 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
बीबीसी मराठीशी बोलताना दीपक अधिकारी सांगतात, "ओरडायला इथे कोणीही नव्हतं. सगळेच लोक आतमध्ये अडकले. संपूर्ण गर्डर खाली कोसळला. आम्ही गावकरी पोहचलो तेव्हा समोर शेतावर काही लोक पडले होते. त्यांना आम्ही उचललं. ते वाचले. समोर वीजेचा खांबही पडला होता. आम्ही पोहचलो तेव्हा कंपनीचे लोकही आले होते."
 
'100 फुटावरून आम्ही खाली पडलो'
 
जखमींची भेट घेण्यासाठी आम्ही सरकारी जिल्हा रुग्णालयात पोहचलो. 33 वर्षीय प्रेम प्रकाश शहापूरच्या उप जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.
 
या दुर्घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत. ते मुळचे बिहारचे असून घरी आई, पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत.
 
आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ते मजुरीच्या कामासाठी आले होते. डिसेंबर 2022 पासून ते व्हिएसएल या कंपनीसाठी मजूर किंवा हेल्पर म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचवेळी ते शहापूरला आले.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "माझ्या पायाला खूप लागलं आहे. पाय उचलू शकत नाहीय. अचानक पूर्ण लाँचर खाली आलं. काय झालं हे कळायच्या आतच दुर्घटना झाली होती. आम्ही सगळे लाँचरवर होतो. कशी झाली याचं कारण नाही सांगू शकत. आम्ही 27-28 जण होतो.आम्ही जवळपास 100 फूट उंचावर होतो काम सुरू होतं,"
 
"आम्हाला अद्याप काही मदत दिलेली नाही. मदत तर मिळाली पाहिजे. घरी मी एकटाच कमावता आहे," असंही ते म्हणाले.
 
ढिगा-यातून बाहेर काढलेले सर्व मृतदेह शहापूरच्या जिल्हा रुग्णालयात ठेवले होते. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पीडितांच्या नातेवाईकांनी सरकारी रुग्णालयात गर्दी केली होती. मृतदेहाची ओळख पाठवण्यासाठी आणि मदतीसाठी कंपनीकडून पत्र घेण्यासाठीही मृतांच्या गावातल्या लोकांची गर्दी झाली होती.
 
बहुतांश कामगार हे बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातून आलेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे कोणी काका, भाऊ, मामा, पुतण्या असे नातेवाईक होते.
 
कुटुंबियांकडे गावी मृतदेह नेण्यासाठीही या सगळ्यांची तयारी सुरू होती.
 
इथे आमची भेट बिहारच्या अमित कुमार यांच्याशी झाली. त्यांच्या गावातील तिघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. यापैकी एक त्यांचे काका होते.
 
अमित कुमार सांगतात, "कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. ही भयंकर दुर्घटना होती. आम्ही आता मृतदेह बिहारला घेऊन चाललो. आम्हाला 36 तास तरी पोहचायला लागतील. सरकारने कुटुंबियांना मदत करावी. तसंच कंपनीनेही आर्थिक मदत करावी," अशी मागणीही त्यांनी केली.
 
मृतदेह ढिगा-याखाली होते, त्यांचे फोन वाजल्याने मदत झाली'
31 जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता शहापूरमधील सरलांबे गावातील रहिवाश्यांना एक मोठा आवाज आला. आपल्या गावाच्या बाजूला समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे याची त्यांना कल्पना होती.
 
मोठे दगडांचा माल खाली उतरवला असेल असं त्यांना सुरुवातीला वाटलं. पण जागेवर पोहोचताच त्यांना धक्का बसला.
 
नाशिक ते भिवंडी असं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सध्या सुरू आहे. या मार्गावर 98 गर्डर बसवण्याचं काम आतापर्यंत झालं आहे. तर शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे 2.28 किलोमीटरवर व्हायडक्ट पुलाचे काम सुरू आहे.
 
पीलर क्रमांक 15 ते 16 यामध्ये गर्डर बसवण्याची पूर्व तयारी 31 जुलैच्या रात्री सुरू होती. यासाठी 28 कर्मचारी आणि कामगार ड्युटीवर होते.
 
स्वयंचलित लाँचरच्या माध्यमातून गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना अचानक गर्डरसह क्रेन खाली कोसळली आणि काम करत असलेले कामगार खाली पडले.
 
गर्डर आणि क्रेनसह कामगार खाली पडल्याने अनेकजण ढिगा-याखाली अडकले होते. एनडीआरएफने जवळपास 18 तास बचाव कार्य केल्यानंतर 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले.
 
एका अधिकाऱ्याने सांगितलं, "शेवटचे तीन मृतदेहाचं लोकेशन आम्हाला कळत नव्हतं. मग आम्ही लोकेशन ट्रॅक करण्यासाठी मोबाईलवर फोन करायचं ठरवलं आणि तिन्ही मोबाईलवर रिंग सुद्धा वाजली. यामुळे आम्हाला शेवटच्या तीन मृतदेहाचं लोकेशन समजलं नाहीतर ढिगारा पाहता आणखी दोन दिवस तरी लागले असते."
समृद्धी महामार्गाचे 701 किलोमीटरपैकी 609 किमीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
 
यासंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील 101 किमी काम प्रगतीपथावर आहे. या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत असून बांधकामासाठी कंत्राटदार नवयुगा इंजिनिअरींग कंपनीने व्हिएसएल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सिंगापूर या जगातील अग्रगण्य कंपनीला हे काम दिलेले आहे.
 
या कंपन्यांचे स्वयंचलित लाँचर वापरण्यात येत असून त्याचे वजन 700 मेट्रिक टन आहे. आतापर्यंत 114 गाळ्यांपैकी 98 गाळ्ययांचं काम पूर्ण केल्याचंही रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केलं.
 
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी रात्री 11.30 वाजता लाँचिंग गर्डर दुसर्‍या दिवशीची तयारी करण्यासाठी हलवत असताना क्रेन पूर्ण झालेल्या गर्डरसह 35 मिटर उंचीवरून खाली कोसळली.
 
सदर ठिकाणी 17 कामगार, 4 अभियंते सात कर्मचारी असे एकूण 28 जण काम करत होते. त्यापैकी या दुर्घटनेत 10 कामगार, 2 अभियंते आणि 8 कर्मचारी असा 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
अपघात कशामुळे घडला?
या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तज्ञ्जांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत, तसंच पालकमंत्री शंभुराज देसाई यांनीही तांत्रिक बाबी तपासल्याशिवाय दुर्घटनेचं कारण सांगता येणार नाही असं म्हटलं आहे.
 
खरं तर यापूर्वीही समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. महिन्याभरापूर्वीच 1 जुलै रोजी बुलढाण्यात समृद्धी महामार्गवर मोठा अपघात झाला. यात 23 जणांचा मृत्यू झाला होता.
 
आता तर थेट महामार्गाच्या बांधकामादरम्यान ही दुर्घटना घडल्याने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.
 
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही याचा उल्लेख केला असून चौकशीची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारवर टीका केली केलीय.
 
"शासनाने मागच्या अपघातांमधून कोणताही धडा घेतलेला नाही हे या अपघातातून सिद्ध होते. समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात पाहता शासनाने यात ठोस धोरण आखले पाहिजे. मदत जाहीर करून जबाबदारी झटकून चालणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे," असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
 
भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही या दुर्घटनेमागे निष्काळजीपणा असल्याची शक्यता वर्तवली आहे.
 
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
 
आता सरकारच्या चौकशीनंतर काय तांत्रिक कारण समोर येतं आणि खासगी कंपनीवर काही कारवाई होते का? हे पहावं लागेल.





Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वेड्या बाभळींमुळे एकेकाळी गजबजलेलं हे गाव आता 'भूताचं' बनलं?