काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यावर संजय निरुपम जवळपास दोन दशकांनंतर पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करू शकतात. शिवसेनेचे नेतृत्व सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. या बैठकीला निरुपमही उपस्थित होते.
निरूपम यांनी 2005 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2009 च्या निवडणुकीत त्यांनी मुंबई उत्तर लोकसभा जागा जिंकली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा निकराच्या लढतीत पराभव केला. त्यांनी गेल्या 19 वर्षांत काँग्रेस पक्षात विविध पदे भूषवली आणि मतभेदांमुळे पक्ष सोडण्यापूर्वी काँग्रेसच्या मुंबई शहर युनिटचे नेतृत्वही केले.
काँग्रेसने गेल्या महिन्यात निरुपम यांची 'अनुशासनहीन आणि पक्षविरोधी वक्तव्ये' केल्याबद्दल सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. त्यापूर्वी काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई उत्तर-पश्चिम जागेबाबत निर्णय घेण्यासाठी पक्षाला 'एका आठवड्याचा अल्टिमेटम' दिला होता. त्यांना या जागेवरून निवडणूक लढवायची होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, 'संजय निरुपम लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिंदे यांनी शिष्टाचार म्हणून केलेल्या भेटीदरम्यान निरुपम देखील उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दोन सभा घेण्याची शक्यता असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे.
मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा सत्ताधारी महायुती आघाडी जिंकेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. यामिनी जाधव, रवींद्र वायकर आणि राहुल शेवाळे या शिवसेनेच्या उमेदवार रिंगणात असलेल्या मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. परवा ते शिंदेंच्या गटात प्रवेश करतील. मुंबईत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे आता संजय निरुपम नाराज असल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेसने देखील पारंपारिक मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे. नाराज होऊन संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडले होते. या मुळे त्यांची सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली.