शिवसेनेने भुकंपाची भाषा केल्यानंतर अवघ्या २४ तासात शेतकर्यांना कर्जमुक्ती देण्यात आली, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी कर्जमाफी ही शिवसेनेमुळेच मिळाली असल्याचे सांगितले.सोमवारी धुळ्यातील मेळाव्यात ते बोलत होते.
भाजपा सरकारने दिलेली ही कर्जमुक्ती मनापासून दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेचा दबाव असल्यामुळेच कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. शेतकर्यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. जर राज्यात भुकंप होऊ द्यायचा नसेल तर २५ जुलैपर्यंत शेतकर्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, असे राऊत यावेळी म्हणाले. शिवसंपर्क अभियान आणि ‘मी कर्जमुक्त होणारच’ या मोहिमेंतर्गत शेतकर्यांकडून शिवसेनेने अर्ज भरुन घेतले आहे. याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.