ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत पहिल्यांदाच आज मुंबईत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले असून शिवसेनेतर्फे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. संजय राऊतांच्या फोटोसह पोस्टरबाजी करताना शिवसैनिक दिसून आले. विमानतळ ते भांडुप रॅली काढून शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहे. दोन दिवसांपूर्वीच संजय राऊतांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर जोरदार वातावरण तापलं होतं. त्यानंतर शिवसेनेकडून हे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. बुधवारीच शरद पवारांनी भेट मोदींची भेट घेत संजय राऊतांवरील ईडीने केलेल्या कारवाईची तक्रार केली होती.
भाजप नेत्यांनी त्यांच्या स्वागतावर बरीच टीका केली
भाजप नेते सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत याचं स्वागत करणे हे चुकीचे आहे. गुंड गजा मारणे जेलमधून सुटल्यानंतर त्याची मिरवणूक निघाली होती. मग त्याला स्वागत म्हणायचं का? त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हे पटणारं नाही. तर संजय राऊत हे घाबरलेले आहेत. त्यांचं मानसिक आरोग्य बिघडलं आहे. त्यांना उपचाराची गरज आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.