Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे प्रस्थान; असा आहे मार्ग…

palkhi vari
त्र्यंबकेश्वर , मंगळवार, 14 जून 2022 (14:45 IST)
तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे काल त्र्यंबकेश्वरहून अतिशय उत्साहात प्रस्थान झाले. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या भक्तिभावाने रम्य झालेल्या वातावरणात, अभंग एकसुरात गात ही पालखी मार्गस्थ झाली. त्र्यंबकेश्वर (Tryambakeshwar) हून निघणारी ही पालखी ही २७ दिवसांत पंंढरपूरला पोहोचणार आहे. या पालखीच्या पायी वाटचालीत जी गावे (villages) येतात, त्यांना वारीचे वेळापत्रक पूर्वीच पाठविण्यात आले आहे. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी चांदीच्या रथासह (chariot) आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे (Pandharpur) निघाली आहे. पंढरपूरमध्ये ९ जुलैला संत निवृत्तीनाथांची पालखी पोहचेल. त्र्यंंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास ४५० किलोमीटर आहे. पालखीला जाऊन-येऊन असा एकूण ४९ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
 
असा आहे संत निवृत्तीनाथ पालखीचा मार्ग … त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या या पालखीचा पहिला मुक्काम सातपूर येथे होणार आहे. त्यानंतर नाशिक, पळसे, लोणारवाडी असा प्रवास करून दातली येथे गोलरिंगण रंगणार आहे. त्यानंतर खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर बु., राहुरी, डोंगरगण असा प्रवास करून अहमदनगर येथे संजीवन समाधी सोहळा रंगणार आहे. पुढे पालखी साकत, घोगरगाव, मिरजगाव, चिंचोली, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले या मार्गाने जाऊन पुन्हा चांभारविहीर येथे गोलरिंगण भरणार आहे. पुढे पालखी करकंच, पांढरीची वाडी या मार्गाने जाऊन चिंचोली येथे चंद्रभागेत स्नान करण्यासाठी थांबेन. त्यानंतर वाखरी येथे रिंगण सोहळा होईल. आणि मग शेवटी ही पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचेल.
 
चार ठिकाणी रंगणार रिंगण सोहळा… या दिंडी सोहळ्यात हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. या दिंडीच्या मार्गावर पहिले रिंगण दि. १७ जूनला सिन्नर तालुक्यातील दातली येथे होणार असून, हे गोल रिंगण असणार आहे. त्यानंतर १ जुलैला धांडे वस्ती (जि. अहमदनगर) येथे उभे रिंगण होणार आहे. दि. ६ जुलैला चांभारविहीर येथे गोल रिंगण सोहळा होणार आहे. दिंडीच्या मार्गावरील शेवटचा रिंगण सोहळा वाखरी येथे होणार आहे. याच प्रवासात दि. २५ जूनला अहमदनगर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत साजरा केला जाणार आहे.
 
२६ ठिकाणी पालखीचा मुक्काम… या पालखीच्या मार्गावर २६ ठिकाणी दिंडीचा मुक्काम राहणार आहे. त्यामध्ये सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर बु., राहुरी, डोंगरगण, अहमदनगर, साकत, घोगरगाव, मिरजगाव, चिंचोली (काळदाते), कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंच, पांढरीची वाडी, चिंचोली या ठिकाणी हा मुक्काम राहणार आहे. या मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित गावकरी तसेच दानशूर लोकांकडून वारकऱ्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणी किर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम पार पडतील.
 
१३ जुलैला परतीच्या मार्गावर… या पालखीच्या मार्गावर रोज दिवसा साधारण वीस किलोमीटर पायी प्रवास केला जातो. रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपूरात पोहोचेल. या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचा मुक्काम पंढरपूरला संत निवृत्तीनाथ मठात राहणार आहे. विठुरायाच्या आणि रुख्मिणी देवीच्या दर्शनानंतर पालखी १३ जुलैला त्र्यंबकेश्वरकडे परतीच्या मार्गाला लागेल. १८ दिवसांचा प्रवास करून ३० जुलैला पालखीचे त्र्यंबकेश्वरमध्ये आगमन होईल, अशी माहिती संस्थान कडून देण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत मान्सून गुजरातेत