Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेळ व श्रम वाचवा, वीजबिल ऑनलाईन भरा!

वेळ व श्रम वाचवा, वीजबिल ऑनलाईन भरा!
, शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (13:23 IST)
एखादे काम बसल्याजागी अन् तेही काही क्षणात होत असेल, तर त्यासाठी जागा सोडण्याची गरज नाही. बदलत्या काळासोबत आपण चाललेच पाहिजे. आजकाल एका क्लिकवर वीजबिले, फोनबिले भरता येतात, पैसे पाठवता येतात. तरीसुद्धा वीजबिले भरण्यासाठी रांगा लागतात, हे वास्तव आहे. या प्रक्रियेत श्रम व वेळ वाया जातो. हे चित्र बदलण्यासाठी ऑनलाईन वीजबिल भरण्याची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे.
 
मुंबई व तिची काही उपनगरे वगळता राज्यभर पसरलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) दोन कोटी ४० लाख वीजग्राहक आहेत. यात दीड कोटीहून अधिक ग्राहक घरगुती आहेत. या सर्व ग्राहकांना घरपोच वीजबिले पाठविली जातात. तरीसुद्धा मिळालेले वीजबिल घरातील कुणाकडून तरी गहाळ होणे किंवा वेळेवर ते न सापडणे, असे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी स्वत:चा ई-मेल आयडी नोंदवून आपले वीजबिल ऑनलाईन मिळविणे सोयीचे ठरते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ग्राहकांच्या हाती अचूक व मानवी हस्तक्षेप विरहित वीजबिल देण्यासाठी महावितरणकडून मोबाईल अॅपद्वारे मीटर रीडिंग घेतले जात आहे. मात्र वीजबिल छापणे, वाटणे आणि ते बिल भरणा केंद्रांवर जाऊन भरणे यात ग्राहक व वीज वितरण कंपनी या दोघांची क्रयशक्ती खर्ची पडते. या सर्वांवर वीजबिल ऑनलाईन मिळविणे व ते ऑनलाईन भरणे हाच रामबाण उपाय आहे.
 
वीजबिल ऑनलाईन मिळविण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.inया संकेतस्थळावर भेट द्या. होमपेजवर डाव्या बाजूला ग्राहकसेवा दिल्या आहेत. पहिल्या क्रमांकावर 'व्ह्यू अँड पे बिल्स ऑनलाईन' व चौथा पर्याय 'रिक्वेस्ट फॉर ई-बिल'चा आहे. सर्वप्रथम 'रिक्वेस्ट फॉर ई-बिल'वर क्लिक करा. उघडल्या जाणाऱ्या विंडोमध्ये तुमचा ग्राहक क्रमांक, चार अंकी बिलिंग युनिट, पीसी क्रमांक व तुमचा ई-मेल आयडी टाका. बिलिंग युनिट म्हणजे जिथे तुमचे वीजबिल तयार होते, त्या उपविभागाला दिलेला चार अंकी क्रमांक होय. तर रीडिंग घेणे व बिले वाटप करणे सोपे व्हावे याकरिता ० ते ९ या नऊ अंकापैकी एक पीसी (प्रोसेसिंग सायकल) क्रमांक दिलेला असतो. या सर्व बाबी वीजबिलावरच असतात. वरील माहिती भरून'सबमिट' या पर्यायावर क्लिक करा. महावितरणला तुमची 'रिक्वेस्ट' पाठविली जाईल. नोंदणी झाल्याचा ई-मेल तुम्हाला ताबडतोब मिळतो. ई-मेल नोंदणी झाल्यापासून येणारे प्रत्येक वीजबिल तुमच्या ई-मेलवर तात्काळ मिळेल. घरपोच येणारे बिलही मिळेल, परंतु, ते ऑनलाईनही उपलब्ध असताना त्यावर अवलंबून राहू नका. पहिल्या सात दिवसांत वीजबिल भरले तर कंपनी त्यावर सूट देत असते. ही सूट मिळविणे ऑनलाईन बिल भरण्यामुळे सोपे झाले आहे.

वीजबिल ऑनलाईन भरण्यासाठी अनेक पर्याय खुले आहेत. महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर आपण स्वत:चे खाते उघडून आपली सर्व माहिती ठेवू शकतो. देशातील प्रमुख व राष्ट्रीयकृत बँकांचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आपण वापरू शकता. तुम्ही इंटरनेट बँकिंग सेवा वापरत असाल तर अधिक उत्तम. वीजबिल भरण्यासाठी 'व्ह्यू अँड पे बिल्स ऑनलाईन' पर्यायावर क्लिक करा. तुमचा ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाका. स्क्रीनच्या डाव्या बाजूला अनेक पर्याय आपल्यासमोर दिसतील त्यातील 'व्ह्यू अँड पे करंट बिल' पर्यायावर क्लिक करा. तुमचे वीजबिल समोर येईल. ते भरण्यासाठी 'पे नाऊ' या ठळकपणे दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक करा. नियम व अटी समोर येतील. त्या कमी वेळेत वाचून 'आय अॅग्री'समोर क्लिक करा, स्वत: जवळ असलेल्या मोबाईलचा क्रमांक नोंदवा. त्यानंतर आपल्या कार्डचा प्रकार व बँक निवडा. पुढील सूचनांचे पालन करा. दिलेल्या मोबाईवर 'सेक्युरिटी कोड' येईल. तो टाकल्यास आपला व्यवहार पूर्ण होईल. परंतु, या प्रक्रियेत कोठेही 'बॅक' किंवा 'रिफ्रेश' करू नका.
मोबाईल अॅपद्वारे असे भरा बिल
गूगल प्ले स्टोअर, आयओएस अॅप स्टोअर किंवा विंडोज स्टोअरवरून महावितरणचे मोबाईल अॅप डाउनलोड करा. अॅपमध्ये साइन अप करा किंवा 'कंटिन्यू अॅज गेस्ट'वर क्लिक करा. त्यानंतर 'व्ह्यू अँड पे बिल' वर क्लिक करा १२ अंकी ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाका. बिलाचा तपशील पडताळून पहा आणि मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर 'पे बिल' या पर्यायावर क्लिक करा. 'पेमेंट मोड' निवडा आणि तपशील भरा. पेमेंट यशस्वी झाल्यांनतर 'ट्रान्झॅक्शन आयडी'सह पावती लगेच मिळेल. 
 
हे सर्व काही एका क्लिकवर आहे. फक्त गरज आहे ती बदल स्वीकारण्याची अन् ऑनलाईन होण्याची. तेव्हा वीजग्राहकांनो रांगेत उभे राहण्याची कटकट नको असेल, तुमचा वेळ व श्रम व पैसे वाचवायचे असतील तर बदलत्या काळानुसार स्मार्ट व्हा आणि वीजबिल ऑनलाईन भरा. त्यासाठी www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल अॅप आपल्यासाठी खुले आहे.
ज्ञानेश्वर आर्दड
जनसंपर्क अधिकारी
महावितरणबारामती परिमंडल

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेस अराउंड ऑस्ट्रिया पूर्ण करणाऱ्या भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांचे जंगी स्वागत