शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या नव्या सूचनाप्रमाणे आता परीक्षा संपताच विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुटीचा मार्ग मोकळा होणार आहे.
या पूर्वी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घ्याव्यात आणि तोपर्यंत शाळा सुरू ठेवाव्यात असे फर्मान शिक्षण विभागाने काढले होते. पण त्यावर शिक्षण आयुक्तांनी आता नव्या सूचना दिल्या आहेत. अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असल्यास तसेच शाळांनी परीक्षांचे नियोजन केले असल्यास त्या घेण्यासाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शाळांसमोरील संभ्रम दूर झाला असून आता परीक्षा संपताच विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुटीचा मार्ग मोकळा होणार आहे.
गेल्या शुक्रवारी शिक्षण विभागाद्वारे काढलेल्या परिपत्रकात उन्हाळ्यातही शाळा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. या परिपत्रकात शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण करून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घ्याव्यात तसेच 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवाव्यात. गरज पडल्यास शनिवारी, रविवारीही शाळा सुरू ठेवाव्यात, असे नमूद केले गेले होते. मात्र यापूर्वीच परीक्षांचे नियोजन केलेल्या शाळांचा या निर्णयामुळे गोंधळ उडाला होता. एप्रिलमध्ये पहिल्या दोन आठवड्यात परीक्षांचे आयोजन केलेल्या शाळांनी परीक्षा पुढे ढकलायच्या का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षांचे नियोजन बदलण्याची गरज नसल्याचे सांगितले गेले आहे.