Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

“शरद पवारांकडे भरपूर ज्ञान आणि नितीन गडकरी तर..”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून कौतुक

“शरद पवारांकडे भरपूर ज्ञान आणि नितीन गडकरी तर..”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून कौतुक
, शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (08:37 IST)
राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरती स्तुतिसुमनं उधळली. या दोघांचे फक्त राज्यातंच नाही तर देशातही मोलाचं कार्य असल्याचे भगत सिंह कोश्यारी म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी विद्यापिठाच्या दीक्षांत सोहळयात राज्यपाल बोलत होते. याच सोहळ्यात कृषी विद्यापिठाकडून शरद पवार आणि नितीन गडकरी यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले.
 
“पदवी मिळवलेल्यांनी आणि प्राध्यापकांनी कधी कधी शरद पवारांकडे जायला हवं. त्यांच्याकडे जाऊन काय करु शकतो विचारायला हवं. त्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे. जसा सूर्याचा रोज नवा उद्य होतो तसेच नितीन गडकरींच्या मनात प्रत्येक वेळी नवा विचार येतो. असं वाटतं की पंतप्रधान मोदी आणि नितीन गडकरी यांच्यात स्पर्धा तर सुरु नाही नवनव्या गोष्टी घेऊन यायची? हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे,” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचे मराठी प्रेम पुन्हा दिसून आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंग्रजीमध्ये सुरू असताना राज्यपाल कोश्यारींनी थांबवले आणि पुढील कार्यक्रम मराठीमध्ये करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान याच कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात १०० टक्के कामकाज मराठीत करण्याचा आदेश काढावा अशी विनंती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी राज्यपाल यांना केली.
 
राहुरी कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो असे म्हटले आहे. “कृषी हा माझा आवडीचा व अभ्यासाचा विषय असून त्यात सखोल ज्ञान प्राप्त करण्याचा माझा प्रयत्न राहिला. त्या अभ्यासाचा हा गौरव आहे असे मी मानतो. कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो,” असे शरद पवार म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक ! बैलाचा पिता-पुत्रावर हल्ला; वडिलांचा जागीच मृत्यू तर मुलगा जखमी