मुंबई: मला वाटतेय की, किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय चुकल्याचे शरद पवारांच्याही लक्षात आले आहे. त्यांच्या लक्षात आले आहे की, समाजाच्या सर्व स्तरातून या निर्णयाला विरोध होत आहे. या निर्णयातून ठाकरे सरकारची अब्रू चालली आहे. जे काही डीलिंग करून या सरकारने काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला, त्यातून हे सरकार एक्स्पोज झाले आहे. त्यामुळे या सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल. हे पवारांच्याही लक्षात आल्यामुळे त्यांनी सरकारला एक प्रकारे सल्लाच दिला आहे की सुधरा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने दिलेल्या मंजुरीवरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या विधानावर फडणवीस यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सरकारमध्ये शहाणपण असेल, तर हा निर्णय मागे घेतील. नसेल, तर आम्ही जनतेमध्ये जातोच आहोत. सर्वच स्तरातून याला विरोध होत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, वाइन तसेच इतर मद्यांमधील फरक समजून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल, तर सरकारने या सगळ्या गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केला तरी माझा विरोध असण्याचे कारण नाही. हा चिंताजनक विषय आहे असे वाटत नाही. पण काहीजणांना वाटत असेल तर त्यासंबंधी राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर त्याच्यात फारसे वावगे होणार नाही, असे शरद पवार म्हणाले होते.