चंद्रपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत किमत चुकवावी लागणार असल्याचं लक्षात आल्यानंतर हे कायदे मागे घेण्यात आले, असं सांगतानाच उशिरा का होईना मोदी सरकारला शहाणपण आलं आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. मोदी सरकारने कायदे मागे घेतले हे योग्यच झालं असंही त्यांनी सांगितलं. कोणतीही चर्चा न करता केंद्र सरकारने हे कायदे आणले. त्यामुळे या कायद्याला विरोध झाला. देशाच्या इतिहासात एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी सीमेवर बसले. थंडी, ऊन, वारा, पावसाचा विचार न करता शेतकरी संघर्ष करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढायला हवा होता. पण त्यांनी हे केलं नाही. तिन्ही कायदे मागे घ्या असं शेतकरी संघटनेने सांगितलं. पण ऐकलं नाही. त्यामुळे संघर्ष झाला. उत्तर प्रदेशचा काही भाग राजस्थान, पंजाब हरयाणातील लोक या आंदोलनात होते. आता पंजाब, उत्तर प्रदेशात निवडणुका आल्या. निवडणूक प्रचारासाठी गावात गेल्यावर शेतकरी जाब विचारतील हे लक्षात आल्यावर केंद्र सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. उशीरा का होईना शहाणपण आलं. याचं दु:ख व्यक्त करत नाही, असं सांगतानाच एक वर्ष संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, असं पवार म्हणाले.