शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.
मोदी सरकारमुळे समाजात कटुता वाढते आहे, समाजात अंतर वाढते, समाजात तेढ निर्माण होतेय, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
समाजामध्ये ,धर्मामध्ये , विविध भाषकांमध्ये कटुता वाढेल असा प्रयत्न भाजप करतंय. समाजात उन्माद वाढायची काळजी मोदी घेत आहेत, असासुद्धा आरोप पवार यांनी केला आहे.
मोदी सरकारला देशात अनुकूल वातावरण नाही
मोदी सरकारला देशात अनुकूल स्थिती नाही. दक्षिण भारतात भाजप आहे कुठे? पंजाब, राजस्थान, झारखंड, ओडिशा आणि बंगाल इथं भाजपची स्थिती काय आहे? इथं भाजप नाहीय, असं पवार सांगतात.
शरद पवारांनी फडणवीस याच्या 'मी पुन्हा येईल' या विधानांची फिरकी घेत मोदींना टोला लगावत म्हटलं, " देवेंद्र फडणवीस यांच्या सारखीच सध्याच्या केंद्रातील सरकारची स्थिती आहे."
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीस यांचा आदर्श घेतलाय, मी पुन्हा येईन असं मोदींनी लाल किल्ल्यावरून म्हटलंय. पण, पण फडणवीस त्याच पदावर पुन्हा आले नाहीत. ते त्याच्या खालच्या पदावर आले. हे मोदींनी लक्षात घ्यावं,” असंसुद्धा शरद पवार यांनी म्हटलं आहे.
भाजप सोबत जाणार नाही- पवार
सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वेगेवेगळे बसतात या प्रश्नावर शरद पवार म्हणतात की, आम्ही भाजप सोबत नाही. मात्र आपल्या सोबत किती आमदार आहेत हे बोलणं पवार यांनी चतुराईनं टाळलं, शून्य आमदार असं उत्तर देत त्यांनी त्यांचं संख्याबळ झाकलंय.
शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या बी प्लान विषयी प्रश्न विचारला असता, "मी त्या विषयी बोलणार नाही, माझं आजच शिवसेनेच्या एका नेत्याशी बोलणं झालं आहे." असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं.
तसंच अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, तर पक्ष निर्णय घेईल असं पवार म्हणालेत.
अजित पवार यांच्यासोबत तुमची गुप्त बैठक झाली असा प्रश्न शरद पवार यांना करण्यात आला होता, त्यावर पवार म्हणाले की,
“गुप्त बैठक वैगरे झाली नाही, पण बैठक झाली हे खरं आहे. ही कौटुंबिक भेट होती. कुटुंब प्रमुख म्हणून माझ्याशी माझ्या कुटुंबातील कुणीही चर्चा करू शकतं. माझ्यासोबत राजकीय चर्चा झालेली नाही. मी पक्षाचा संस्थापक आहे तर माझ्याशी काय कोण चर्चा करणार?"
तसंच अजित पवारांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर लहान लोकांबद्दल मी चर्चा करत नाही, असा टोला अजित पवार यांचं नाव न घेता त्यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मान्यवरांशी भेटीगाठी घेतल्या, गेल्या 8 -10 दिवसांपासून कार्यकर्त्यांशी संवाद सुरु असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे.
गुरुवारी पवार यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेऊन होणार आहे. त्यानंतर ते राज्यभर सभा घेणार आहेत.
सहकारी आखून देतील तसा राज्यभर कार्यक्रम आखू, असं पावर यांनी यावेळी म्हटलं आहे.
शरद पवार ज्या बीडमध्ये सभा घेणार आहेत तिथेच अजित पवार गट ही सभा घेणार असल्याच्या प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना शरद पवार बोलले की "लोकशाही मध्ये कोणालाही सभा घेण्याचा अधिकार आहे. तिथे त्यांच्या जिल्ह्याचा एक मंत्री आहे. त्याच्या विषयी काय चर्चा आहेत तुम्हाला माहित आहेच."
मोदींवर जोरदार टीका
नरेंद्र मोदी सरकारनं नवीन सर्क्युलर काढलंय. त्यात 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मरण दिवस म्हणून साजरा करा असं म्हटलंय. त्यातून दोन समाजातला भेद दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.
आम्ही इंडियाच्या बैठकीत हा मुद्दा मांडू, विविध राज्यातही या सर्क्युलरचा विरोध करण्याची भूमिका इंडिया आघाडीने घ्यावी यासाठी भूमिका बैठाकीत मांडू, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नॉर्थ ईस्ट संवेदनशील प्रदेश आहे, चीनची सीमा आहे, अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं पवार यांनी म्हटलंय.
नॉर्थ ईस्टमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या देशाच्या ऐक्याला धोका आहे, मणिपूरमध्ये 90 दिवस झाले, दोन समाजात कटुता आहे, संसदेत अविश्वास ठरावावेळी मोदी त्यावर 3 ते 4 मिनिटं बोलले. संसदे बाहेरही 2 ते 3 मिनटं बोलले, त्यांना मणिपूर महत्त्वाचं वाटत नाही, तिथे जावं असं पंतप्रधानांना वाटत नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
टिळक पुरस्काराला काँग्रेस नेतेही उपस्थित होते
पंतप्रधान मोदी यांना देण्यात आलेल्या टिळक पुरस्कारावेळी आपल्या उपस्थिती विषयी बोलताना पवार सांगतात की, “सहा महिन्यापूर्वीच हा कार्यक्रम ठरला होता. सुशील कुमार शिंदे हे टिळक पुरस्काराच्या विश्वस्त मंडळावर आहेत, ते काँग्रेसचे नेते आहेत. रोहित टिळक काँग्रेसचे नेते आहेत तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते, पण तुम्ही फक्त माझ्याबाबद्दलचं का चर्चा करता," असा उलटा सवाल त्यांनी पत्रकारांना केला.
राज ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर बोलाल्याला मी त्यांचा प्रवक्ता नाही असं पवार म्हणाले.
या राजकीय सवालांमध्ये पवार रेंगाळलेल्या मान्सूनवर ही बोलले, " हवामान खात्याचा अंदाज आहे की येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडेल. मी तर म्हणतो चांगला पाऊस होत असेल तर हवामान खात्याच्या तोंडात साखर पडो.” राज्य सरकारनेही उपाय योजना कराव्यात असा सल्ला पवार यांनी दिला.
निवडणूक आयोग स्वतः निर्णय घेत नाही - पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटीस बाबत विचारलं असता, शरद पवार सांगतात की,
"निवडणूक आयोगाला मी लेखी उत्तर पाठवलं आहे, त्यात पक्षाची स्थापना आणि पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी याचा उल्लेख आहे. मला चिंता पक्ष चिन्हाची नाही. पण निवडणूक अयोग्य स्वतः निणर्य घेत नाही यांची चिंता आहे. केंद्रातील काही घटक निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करतात. विरोधकांना अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.”
उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेताना केंद्र सरकार मधील काही घटकांचा हस्तक्षेप दिसला असा आरोप पवार यांनी केलाय. हा सत्तेचा गैरवापर आहे. मी चौदावेळा निवडणूक लढवली तेव्हा चिन्हाचा विचार केला नाही, असंही पवार म्हणाले आहेत.