राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे”. कार्यकर्त्यांना आवाहन करताना शरद पवार यांनी, “सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी,” असं म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त टीव्ही माध्यमात आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याशी तसेच बँकेशी आपला काही एक संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मी स्वतः ईडीच्या कार्यालयात २७ सप्टेंबरला हजर होऊन चौकशीला सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. बुधवारी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यांत माझंही नाव आहे. माझ्या आयुष्यातील हे दुसरं प्रकरण आहे. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे हे संध्याकाळी मला कळलं. त्यांच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे, असं पवार यांनी यावेळी सांगितलं होतं. बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी, “ईडीने माझ्यासंदर्भात शिखर बँक प्रकरणात जो गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भात मी माझी स्वतःची भूमिका अशी आहे की मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार.
नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतलं पाहिजे,” असं म्हटलं होतं.तसंच संपूर्ण महिनाभर मी निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे. त्यामुळे माझं वास्तव्य मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये मी स्वतः जाणार आहे. तिथे जाऊन ईडीचा ‘पाहुणचार’ स्वीकारणार आहे असा टोलाही त्यांनी लगावला होता.