मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे आणि राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षांकडून त्यावर प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या भूमिकेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. राज ठाकरेंनी सकाळी बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर केल्याबाबत राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंनी सकाळी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना दिसत आहेत. “ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील”, असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणत आहेत.