Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील पहिले महाआरोग्य शिबीर

राज्यातील  पहिले महाआरोग्य शिबीर
, शनिवार, 31 डिसेंबर 2016 (10:50 IST)
गरीब आणि गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचणे शक्य नसते. शस्त्रक्रीया किंवा औषधोपचाराचा खर्चदेखील मोठा असल्याने बऱ्याचदा आजार अंगावर काढला जातो आणि रुग्णाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. अशा रुग्णांवर औषधोपचार आणि शस्त्रक्रीया करण्यासाठी शिबिराचे आयोजन भाजपकडून करण्यात आले आहे. नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे विनामुल्य  महाआरोग्य शिबिर संपन्न होत आहे. या शिबिरासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हे सर्वात मोठे आरोग्य शिबीर ठरणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर्स एकाच दिवशी उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे.याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.
 
या शिबिराला वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संस्था, औषध विक्रेत्यांच्या संस्था, विविध सेवाभावी संस्था, टाटा ट्रस्ट, रिलायन्स फाऊंडेशन, एम्पथी फाऊंडेशन  आदी देशपातळीवरच्या संस्था, औद्योगिक क्षेत्रातील संघटना, स्थानिक सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था अशा सर्वांचे सहकार्य मिळत आहे. प्राथमिक तपासणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत वैद्यकीय महाविद्यालय,  नाशिक शहरातील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालये, महापालिका रुग्णालये, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी 31 डिसेंबरपर्यंत प्राथमिक तपासणी सुरू राहणार आहे. ज्या भागात अशी सुविधा नसेल किंवा दुर्गम भाग असेल त्याठिकाणी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
 
शिबिराला नामांकीत डॉक्टर उपस्थिती
आरोग्य शिबिरात मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यात येणार असून त्यासाठी पद्मविभूषण डॉ.कांतीलाल संचेती, पद्मभूषण डॉ.रमाकांत पांडा, पद्मश्री डॉ.अमित मायदेव, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ.रतन देशपांडे, पद्मश्री डॉ.शशांक जोशी, पद्मश्री डॉ. शरद हर्डीकर,   पद्मश्री डॉ.अशोक गुप्ता, पद्मश्री डॉ.नटराजन, पद्मश्री डॉ.विकास महात्मे, पद्मश्री डॉ.अशोक गुप्ता, डॉ.सी.एन.देवपुजारी, डॉ.बी.के मिश्रा,  डॉ.अजय चंदनवाले, डॉ.मानसिंग पवार, डॉ.श्रीराम सावरीकर,  डॉ.शैलेश पुणतांबेकर, डॉ.कुलदिप कोहली, आरोग्य संचालक डॉ.प्रविण शिनगारे, डॉ.जयश्री तोडकर अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज यांच्यासह नामांकीत डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
 
मोबाईल अँप द्वारे नोंदणी
विनामुल्य  महाआरोग्य शिबिरासाठी रुग्ण नोंदणी मोबाईल अँप द्वारे सुद्धा सुरु आहे. या नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 31 डिसें पर्यंत मोबाईल अँप द्वारे नोंदणी करता येणार आहे. सदर अॅपद्वारें महाआरोग्य शिबीर अंतर्गत नोंदणी साठी अँड्रॉइड मोबाइल वापरकर्ते रुग्ण प्ले स्टोर वर जाऊन शिबिरा बाबतची माहिती विस्तृत स्वरूपात उपलब्ध करून घेत आहेत. त्याचा गरजू रुग्णांचा लाभ झाल्याचे दिसून आले आहे. हे अँप्लिकेशन रुग्ण गुगल प्ले स्टोर मध्ये जाऊन ‘नाशिक आरोग्य शिबिर‘ टाईप करून डाऊनलोड करत आहेत. आधार कार्ड वापरूनही नोंदणी करता येणार आहे. एकदा रजिस्टर केल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून पुन्हा लॉगइन करावे. त्यानंतर आपल्याला हव्या त्या आरोग्य समस्येबद्दल माहिती अँपमध्ये दिलेल्या पर्यायातून निवडावी.
ग्रामीण भागात 150 प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातून 325 डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. तर महापालिका क्षेत्रातील 36 केंद्र आणि राजीव गांधी आरोग्यदायी योजनेअंतर्गत असणारी 22 रुग्णालये तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व रुग्णालयातदेखील तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.
 
तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणी नंतर गरज असल्यास शस्त्रक्रीयेसाठी रुग्णाला 31 जानेवारीपर्यंत निश्चित दिवस सांगण्यात येईल. शस्त्रक्रीयेसाठी त्याला आणण्याची व परत नेण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे. शेवटच्य रुग्णावर उपचार होईपर्यंत ही प्रक्रीया सुरू राहाणार. केवळ तपासणी करण्याकरिताचे हे शिबीर नसून रुग्णाला बरा होईपर्यंत उपचार करण्यात येणार आहे. नाशिक तसेच मुंबई येथील नामांकीत रुग्णालयातदेखील शस्त्रकीया होणार आहेत. मोफत औषधोपचाराची सुविधा देखील करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन ट्रक औषधे आली असून आणखी औषधे येणार आहेत.
 
भव्य मंडपाची उभारणी
शिबिरासाठी गोल्फ क्लब परिसरातील ईदगाह मैदानावर भव्य मंडपाची उभारणी करण्यात येत असून त्यात तपासणी विभाग, बाहयरूग्ण विभाग तसेच भोजन कक्षही उभारण्यात आला आहे.
 
यावर उपचार आणि मार्गदर्शन
शिबिरात नेत्ररोग, हृदयरोग, आस्थिरोग, जनरल सर्जरी, मेंदुरोग,  बालरोग, किडनी व किडनी संबधी विकार,प्लास्टीक सर्जरी, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, जनरलमेडीसीन, चेस्टीडिसीज, श्वसन संस्थेचे आजार, कर्करोग,ग्रंथीचे आजार, दातांचे विकार मनोविकार, आहार व पोषण,  रेडिओलॉजी,  त्वचा विकार, अनुवंशीक विकार,लठ्ठपणा व आयुष विभाग आदी 22 विभागात तपासणी व गरजूंवर शस्त्रक्रीयादेखील करण्यात येणार आहे. प्रथमच आयुर्वेद ओपीडी आणि जिनेटीक ओपीडी सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
शिबिरासाठी ग्रामीण भाग तसेच शहरातील विविध प्रभागात वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे. शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्यदायी योजने अंतर्गत  30 रुग्णालयात 1 ते 31 जानेवारी 2017दरम्यान शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विदर्भातील विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी तीव्र लढा उभारणार- संग्राम कोते पाटील